सुमारे 2 कोटी रुपयाचे नुकसान -
विजेत प्रॉडक्ट्स प्रा.ली या केमिकल फॅक्टरीचे अंदाजे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक तपासात सांगितले जात आहे. तारदाळ जवळ असणाऱ्या आवडी टेक्स्टाईल पार्कमधील या केमिकल फॅक्टरीला शॉर्टसर्किटने आग लागली. केमिकल फॅक्टरी असल्याने आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण झाले. त्यामुळे घटनास्थळी असलेल्या काही कामगारांची पळापळ सुरू झाली. या घटनेची माहिती इचलकरंजी येथील अग्निशामक दलाला व घोडावत अग्निशामक दल जयसिंगपूर यांना कळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेल्या तीन तासापासून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.आग इतकी मोठी आहे की सुमारे दोन किलोमीटर पर्यंत आगीचे लोट दिसून येत होते. या फॅक्टरीमध्ये लागलेल्या आगीच्या ज्वाळामुळे शेजारीच असणार्या एका यंत्रमाग कारखान्याने देखील पेट घेतली आहे. त्यामुळे यंत्रमाग कारखान्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
मालकाच्या डोळ्यासमोर फॅक्टरी जळाली -
विजेत प्रॉडक्ट्स प्रा.ली या केमिकल फॅक्टरीचे मालक विशाल कोथळे हे असून फॅक्टरी ला आग लागलेली पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. डोळ्यासमोर फॅक्टरी जळत असल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती तसेच हाकणे पोलीस दाखल झाले होते. या आगीमध्ये सुमारे त्यांची दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.