कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यांपासून कोल्हापूर शहरातील व्यसाय बंद होते. अखेर हे व्यवसाय आता पुन्हा एकदा सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत. तसेच, अनेकांनी सरकारचे आभारही मानले आहेत. दरम्यान, पुन्हा निर्बंध घालू नका, अशी विनंतीही सर्वांनी केली आहे. कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आम्ही शासनाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करू. मात्र, आता पुन्हा लॉकडाउन नको अशी प्रतिक्रिया सर्व व्यापाऱ्यांनी दिली आहे.
5 दिवसांची परीक्षा
५ जुलै ते 9 जुलैपर्यंत कोल्हापूर शहरातील व्यवसायांवर घालण्यात आलेले निर्बंध उठवण्यात आले आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेत आपले व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोल्हापूर शहरामध्ये अजूनही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दररोज एक हजारपेक्षा अधिक रुग्ण आजही कोल्हापूर जिल्ह्यात सापडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी या पाच दिवसांच्या कालावधीत नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. निर्बंध शिथिल केल्यानंतर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली तर पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्यात येतील, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक व्यापारी आता शासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करताना पाहायला मिळत आहेत. तसेच, ग्राहकांनीही खरेदीसाठी येताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे.
काही ठिकाणी नागरिकांची गर्दी
शहरातील काही महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये आज निर्बंध शितल होताच गर्दी पाहायला मिळाली. अनेक दिवसांपासून आपल्याला हव्या असलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक आज घराबाहेर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे महत्वाच्या रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ पाहायला मिळाली. मात्र, अनेक दुकानांमध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याचेही चित्र आहे.
केवळ कोल्हापूर शहरातील निर्बंध उठवले
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरु करण्याबाबत परवानगी द्यावी यासाठी आंदोलन केली होते. तसेच, प्रशासनाला याबाबत निवेदनही दिले होते. आम्ही कोणत्याही परिस्थितीत दुकाने सुरू करणार असल्याचा पवित्रा कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांनी घेतला होता. दरम्यान, जिल्ह्यातील सद्यस्थितीत कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट पाहता पुढच्या पाच दिवसांसाठी केवळ कोल्हापूर शहरातील निर्बंध हटवण्यात आले आहेत. कोल्हापूर शहर सोडून जिल्ह्यात इतर सर्व ठिकाणी 'स्थर चार'चे निर्बंध कायम असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.