कोल्हापूर - 1995 पासून तब्बल 11 वेळा गावातील ग्रामपंचायत निवडणूक लढवली. यामध्ये एकदाही यश न आलेल्या 90 वर्षीय आजोबांना कोल्हापूरातल्या हातकणंगले तालुक्यातील माणगांव ग्रामपंचायतमध्ये आठ दिवसांसाठी प्रतिकात्मक सरपंच पदाचा मान देण्यात आला आहे. त्यांनी लोकशाहीवर विश्वास ठेवत आजवर 11 निवडणुका लढविल्या आणि म्हणूनच त्यांचा आगळ्या वेगळ्या पद्धतीने सन्मान करण्यात आला आहे. 90 वर्षीय आजोबांच्या या सन्मानाची आता जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.
1965 ते 2015 प्रत्येक ग्रामपंचायत निवडणूक लढवणारे बापू -
गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण तसेच समाजकारणाची आवड असलेले हातकणंगले तालुक्यातल्या माणगांव गावातील 90 वर्षीय बापू पिरा कांबळे यांना प्रतिकात्मक सरपंच पदाचा मान दिल्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले आहेत. त्याचे झाले असे की, बापू कांबळे यांना राजकारणाची प्रचंड आवड आहे. गावातील ग्रामपंचायत निवडणूक लढवून गावात अनेक विकासकामे करण्याची त्यांची ईच्छा, त्यामुळे त्यांनी 1965पासून आजपर्यंत तब्बल 11 वेळा निवडणुका लढविल्या. मात्र, दुर्दैवाने यामध्ये त्यांना यश प्राप्त करता आले नाही. अनेकजण आपल्या क्षेत्रात अपयश आले की, ते क्षेत्र सोडून देतात किंव्हा प्रयत्न करणेच सोडून देतात. मात्र, बापू कांबळे यांनी तब्बल 50 वर्षे ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून जाण्यासाठी प्रयत्न करणे सोडले नाही. बापू कांबळे यांनी सद्या नव्वदी पार केली आहे आणि त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने त्यांना प्रतिकात्मक सरपंच पदाचा मान देण्याबाबत माणगांव ग्रामपंचायतीला पत्र पाठवले आहे. गावच्या विद्यमान सरपंच राजू मगदूम यांनी हा आपल्या गावाचा गौरव असल्याचे म्हणत तात्काळ याबाबत मासिक सभेत चर्चा करून निर्णय घेतला आणि घटस्थापनेच्या मुहूर्तावर 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर अशा एक आठवड्यासाठी बापू कांबळे यांनी सरपंच पदाचा मान दिला आहे.
कोणकोणत्या सालात बापू कांबळे यांनी निवडणूक लढवली यावर एक नजर -
बापू कांबळे 1962 पासून गावातील राजकारणात आहेत. यांनी सर्वात पहिला 1965 साली निवडणूक लढवली तर त्यांनी शेवटची निवडणूक 2015 साली लढवली.
- पहिली निवडणूक - 1965
- दुसरी निवडणूक - 1970
- तिसरी निवडणूक - 1975
- चौथी निवडणूक - 1980
- पाचवी निवडणूक - 1985
- सहावी निवडणूक - 1990
- सातवी निवडणूक - 1995
- आठवी निवडणूक - 2000
- नववी निवडणूक - 2005
- दहावी निवडणूक - 2010
- एकरावी निवडणूक - 2015
विद्यमान सरपंच राजू मगदूम यांनी जिल्हा परिषदेकडे केला पत्रव्यवहार -
गावातील राजकारणात आवड आहे. मात्र, तरीही यश आले नाही. त्यामुळे त्यांचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे, असे विद्यमान सरपंच राजू मगदूम यांच्या मनात होते. त्यानुसार त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत याबाबत सर्वांशी चर्चा केली. त्यानुसार त्यांनी जिल्हा परिषदेकडे याबाबत पत्रव्यवहार केला. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सुद्धा ग्रामपंचायत तरतुदींना कोणत्याही प्रकारे बाधा न आणता बापू कांबळे यांना प्रतिकात्मक सरपंच पदाचा मान द्यावा, असे माणगांव ग्रामपंचायतीला पत्र पाठवले. वयाच्या नव्वदाव्या वर्षी सुद्धा त्यांची गावासाठी काहीतरी काम करण्याची असलेली इच्छा पाहून अनेकांना प्रेरणा मिळते त्यामुळे त्यांना आठ दिवसांसाठी आम्ही सरपंच पदाचा मान दिला असल्याचे विद्यमान सरपंच राजू मगदूम यांनी म्हटले शिवाय त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा सुद्धा दिल्या.
हेही वाचा - ड्रग्ज क्रुझ प्रकरण : एनसीबीने 11 जणांना पकडून तिघांना सोडले - नवाब मलिकांचा आरोप