कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. यामध्ये अनेक गोष्टींवर अजूनही निर्बंध घालण्यात आले आहेत. शाळा महाविद्यालये कधी सुरू होतील याबाबत आणखी काही स्पष्टता नाही. मात्र, असे असताना कोल्हापुरातील हातकणंगलेमध्ये एका खासगी क्लास चालकाने क्लास सुरू ठेवला होता. धक्कादायक म्हणजे त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राणा प्रकाश मोरे असे या क्लास चालकाचे नाव असून त्यांच्यावर आता हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या क्लास चालकाने स्वतःच्या घरी व विदयार्थांच्या घरी जाऊन 2 जुलैपासून क्लास चालू ठवले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा त्यांच्याशी संपर्क झाला आहे. दरम्यान, कोरोनाचा हातकणंगले आणि परिसरात प्रादुर्भाव वाढत असताना क्लास घेतल्याने व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याने हातकणंगले पोलिसात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपंचायत कर्मचारी चॉँदसाहेब मुजावर यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. याबाबतच अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत. दरम्यान, लॉकडाऊन काळात प्रशासनाच्या प्रत्येक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.