कोल्हापूर - हनी ट्रॅपला कंटाळून तरुणाने जीवन यात्रा संपवल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे घडली. फेसबुकवरून संपर्कात आलेल्या महिलेशी अश्लील चाळे झाल्यानंतर महिलेने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या छळाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली. संतोष मनोहर निकम, असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा - सुसाट दुचाकींच्या धडकेत बाप-लेकांचा जागीच मृत्यू, एक गंभीर
गेल्या काही दिवसांपासून संतोष हा फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणीच्या संपर्कात आला होता. फेसबुकवरून त्यांच्यात मैत्री झाली आणि संबंधित महिलेने संतोष याच्याशी फेसबुकच्या माध्यमातून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांचाही व्हिडिओ संवाद सुरू झाला. या मोहजालात फसवत हरियाणातील तरुणीने स्वतः अश्लील चाळे करत संतोषला देखील अश्लील चाळे करण्यास प्रवृत्त केले. याचाच फायदा घेत संबंधित तरुणीने संतोष यांच्याकडे पैशाची मागणी केली. अन्यथा व्हिडिओ व्हायरल करून बदनाम करण्याची धमकी दिली. आपण मोहजालात फसलो असल्याचे लक्षात आल्याने संतोष निराश झाला. निराशेने ग्रासलेल्या संतोषने दोन दिवसांपूर्वी घरात आत्महत्या केली. याबाबत पोलिसांनी अधिक तपास केला असता हे प्रकरण समोर आले . याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
हनी ट्रॅपचा हा जिल्ह्यातील पहिला बळी असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, याबाबत अनेक तक्रारी निनावी पत्राद्वारे पोलिसांकडे आले आहेत, मात्र तरुणांनी धाडसाने समोर येऊन याबाबत तक्रार दाखल करावी, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले.
हेही वाचा - भुरट्या चोरांनी मारला खाद्य तेलाच्या डब्ब्यासह दुधांच्या कॅरेटवर डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद