कोल्हापूर - जिल्ह्यात गेल्या २० दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने खरीप पीके धोक्यात आली आहेत. माळरान व डोंगरमाथ्यावरील पिके पिवळी पडली आहेत. पाण्याअभावी जिल्ह्याच्या पश्चिम भागात भात व नागली पिकेही वाळले असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे दुपार पेरणीचे संकट वाढले असून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहे.
गेल्या पाच-सात वर्षांत पहिल्यांदाच जुलै महिन्यात सलग पंधरा दिवस पावसाने दडी मारली आहे. ऐन खरीप पिकांची वाढ होण्याच्या कालावधीतच पाणी नसल्याने पिके अडचणीत आली आहेत. विशेषत: भातपिकाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. मात्र, रोप लावणी झाल्यापासूनच पाऊस गायब झाल्याने रोप लावलेली जमिनींना भेगा पडल्या आहेत. माळरान व डोंगरमाथ्यावरील भात, नागली, भूईमूग पिके पाण्याअभावी पिवळी पडू लागली आहेत. मोठ्या कष्टाने जगवलेली पिके करपू लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी उभा राहिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात हवामान कोरडे आहे, तर काही ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावल्याने हवेत गारठा वाढला आहे.
४ ऑगस्टनंतर पावसाची शक्यता?
गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात प्रचंड अतिवृष्टी झाली होती, तर यंदा हवामान विभागानेही अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, गेल्या २० दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. मात्र, आजदेखील हवामान विभागाने ४ ऑगस्टनंतर पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
धरणातील उपसा थांबवला -
गेल्यावर्षी जिल्ह्यात महापुराचे संकट ओढवले होते. जिल्ह्यातील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरले होते. पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी येत होते. मात्र, यंदा ही परिस्थिती ओढवू नये यासाठी मे महिन्यापासून धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला होता. मात्र, पावसाने दडी मारल्याने धरणांतून विसर्ग बंद करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील आतापर्यंतचा पाणीसाठा -
१) राधानगरी - ८.३६ टीएमसी - ६८ टक्के
२) तुळशी - ३.४७ टीएमसी- ५७ टक्के
३) वारणा(सांगली) - ३४.३९ टीएमसी- ६७ टक्के
४) दुधगंगा - २५.३९ टीएमसी- ६७%
५) कासारी - २.७५ टीएमसी- ६८%
६) कडवी - २.५१ टीएमसी- ५७%
७) कुंभी - २.७१ टीएमसी- ७०%
८) पाटगाव - ३.७१ टीएमसी- ७३%
९) चिकोत्रा - १.५२ टीएमसी- ५३%
१०) चित्री - १.८८ टीएमसी- ५३%
११) जंगमहट्टी - १.२० टीएमसी- ७२%
१२) घटप्रभा - १.५६ टीएमसी- ८७%
१३) जांबरे - ०.८२ टीएमसी- १००%
१४) कोदे - ०.१२ टीएमसी- १००%