कोल्हापूर - जिल्ह्यातील शिरोळमध्ये आज भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. जवळपास 300 हून अधिक बैलगाडी या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. बैल या प्राण्याला जंगली प्राण्यातुन वगळून त्यांच्या बैलगाडी शर्यतीला परवानगी द्यावी. या मागणीसाठी आज शिरोळमध्ये शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तहसील कार्यालयावर मोर्चा काढत आपल्या भावना व्यक्त केल्या. राज्य सरकार- केंद्र सरकारने याचा तात्काळ विचार करावा. अन्यथा गुन्हे दाखल करायचे असतील तर करा आम्ही शर्यती सुरू करणार असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
पेटा या प्राणी सेवा संघटनेने बैलगाडी शर्यतीवर बंदी घालावी अशी मागणी करत न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर तब्बल अकरा वर्ष बैलगाडी शर्यती ला बंदी आहे. तर सरकारने बैल या प्राण्याला जंगली प्राण्याचे समाविष्ट केल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये पुन्हा एकदा असंतोष निर्माण झाला आहे. बैलाला जंगली प्राण्यातून वगळावे तसेच बैलगाडी शर्यती ला परवानगी द्यावी या मागणीसाठी राज्यभरातील शेतकरी आक्रमक झाला आहे. आज शिरोळमध्ये मोर्चा काढला. राज्य आणि केंद्र सरकारने समन्वयाने यावर तोडगा काढून बैलगाडी शर्यत परवानगी द्यावी. तसेच जंगली प्राणी या यादीतून वगळावे. अशी मागणी मान्य करावी, अन्यथा आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील. येणाऱ्या काळात आम्ही बैलगाडी शर्यती सुरू करू, असा इशारा आता शेतकऱ्यांनी दिला आहे.
राज्यव्यापी बैठकीनंतर ठरणार आंदोलनाची पुढील दिशा
दरम्यान या मागणी संदर्भात 15 ऑगस्ट नंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. त्यासोबत राज्यातील सर्वच जिल्ह्यातील प्रतिनिधींना एकत्रित करून तीव्र आंदोलन दिशा ठरवणार असल्याचं यावेळी सांगण्यात आले.