कोल्हापूर Farmer Success Stories : पारंपरिक पिकांपेक्षा फळभाज्यांमध्ये मिळत असलेला नफा ओळखत कोल्हापुरातील पट्टणकोडोली येथील सचिन काकासो अवटे हे गेल्या 8 वर्षांपासून फळभाज्यांची शेती करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी कारले आणि टोमॅटोची शेती केली. त्यातून ते आता दिवसाला 15 ते 20 हजार रुपयांचं उत्पन्न मिळवित आहेत. तर एका पिकातून सहा महिन्याला सरासरी 7 ते 8 लाखांचा नफा होतो.
- मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. त्यामुळं अनेकांच्या शेतीचं नुकसान झालंय. मात्र असं असतानाही सचिन अवटे स्वतः बाजार समितीत जाऊन टोमॅटो अन् कारल्याची विक्री करतात. तसंच सध्या बाजारात इतर भाज्यांची आवक कमी असल्यानं त्यांना चांगला नफा मिळत आहे.
नोकरी करुन तुटपुंजा पगार, यामुळं घेतला शेती करण्याचा निर्णय : हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे राहणाऱ्या सचिन काकासो अवटे यांचं एमएचं शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना एमआयडीसीमध्ये एका खासगी कंपनीत नोकरी देखील लागली. मात्र दोन वर्ष काम करूनदेखील मिळत असलेली तुटपुंजी पगार यामुळं अवटे यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. सचिन अवटे यांचे वडील काकासो अवटे हे पूर्वीपासून त्यांच्या एक एकर दहा गुंठे जागेमध्ये ऊसाची शेती करायचे. मात्र ऊस शेतीमधून मिळत असलेला नफा हा अत्यंत कमी असल्यानं सचिन यांनी पारंपारिक ऊस शेतीला फाटा दिला. त्यांनी वडिलांशी त्यांनी चर्चा करत अत्याधुनिक शेतीचं महत्त्व पटवून दिलं. यामुळं वडिलांचीही साथ त्यांना मिळाली. त्यांनी 2015 पासून त्यांनी फळभाज्यांचं उत्पन्न घेण्यास सुरुवात केली.
''शेतीमध्ये नव्यानं सुरुवात करणाऱ्या युवकांनी पारंपारिक उसाच्या शेतीचं उत्पन्न घेण्याऐवजी योग्य मार्गदर्शन घेऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेती केल्यास अधिक फायदा होऊ शकतो"- सचिन काकासो अवटे, शेतकरी
एक एकरात कारले आणि टोमॅटोची लागवड : सुरुवातीला अवटे यांना अत्याधुनिक फळभाज्यांची शेती कशी करावी, याची कोणतीही माहिती नव्हती. मात्र त्यांनी परिसरात फळभाज्यांची शेती करणाऱ्या मित्रांकडून आणि गणेश कृषी सेवा केंद्र , तळंदगे येथील शेती मार्गदर्शक भोजकर यांच्याकडून याविषयी माहिती घेतली. त्यानंतर अवटे यांनी एक एकरमध्ये फळभाज्यांची लागवड करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी दोडका, मिरची, वांगी या पिकांच उत्पन्न घेतलं. यातून त्यांना भरघोस नफा मिळाला. ऑगस्ट 2023 मध्ये त्यांनी वीस गुंठ्यामध्ये साई जातीचे टोमॅटो तर उरलेल्या वीस गुंठ्यात प्रगती जातीच्या कारल्यांची लागवड केली. पाणी कमी लागावं यासाठी त्यांनी ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपर तंत्रज्ञानाचा वापर केला. कारल्याचं पीक लावण्यास त्यांनी मंडप पद्धतीचा अवलंब केला.
6 महिन्यात 8 लाखांचा नफा : प्रगतीशील शेतकरी अवटे यांना आतापर्यंत रोप, बियाणे, नांगरणी, औषध, लागण यासाठी साधारण 80 हजार रुपयांचा खर्च आलाय. साधारण 60 ते 70 दिवसानंतर दोन्ही पिकांच उत्पन्न येण्यास सुरुवात होते. रोज 700 किलो टोमॅटो आणि 300 किलो कारली ते एक एकरातून काढतात. त्यांच्या दोन्ही भाज्या कोल्हापूर आणि इचलकरंजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जातात. येथे साधारण टोमॅटोला 30 ते 35 रुपये तर कारल्याला 20 ते 25 रुपये दर मिळतो. यातून सरासरी त्यांना दर 6 महिन्याला 7 ते 8 लाख रुपयांचा नफा होतो. आतापर्यंत अवटे यांनी 12 टन टोमॅटोचं उत्पन्न काढलं असून हंगाम संपेपर्यंत 16 टन पर्यंत उत्पन्न काढण्याचं नियोजन असल्याचंही ते म्हणाले.
हेही वाचा -