कोल्हापूर - गोकुळ दूध संघाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसे अनेक हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण जिल्हाच ढवळून निघाला आहे. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गोकुळच्या सत्ताधारी गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे शेट्टी कोणाला पाठिंबा देणार या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला. आम्ही अनेक वेळा गोकुळ दूध संघाच्या विरोधात अनेक मोर्चे काढले आंदोलने केली. आमचा गोकुळ 'मल्टिस्टेट' होण्याला विरोध होता आणि यापुढेही गोकुळ मल्टिस्टेट होणार नाही हे आश्वासन घेऊनच आम्ही सत्ताधारी गटाला पाठिंबा जाहीर केला असल्याचे यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले.
गोकुळ दूध संघाकडून प्रत्येक 10 दिवसाला बिल दिले जाते. 10 दिवसाला बिल देणारी ही एकमेव संस्था आहे, हे सुद्धा मान्य केले पाहिजे. आम्ही यापूर्वी गोकुळ विरोधात आंदोलने केली, दुधाचा भाव मागितला आणि तो मिळाला सुद्धा. गेल्या वर्षी टाळेबंदीमध्ये सुद्धा दूध उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात दूध येत होते. मात्र संस्थेने त्यांचे दूध नाकारले नाही. ते स्वीकारून त्याची पावडर केली आणि त्या संकटकाळात सुद्धा उत्पादकांना बिले दिली. खऱ्या अर्थाने टाळेबंदीमधील 6 ते 7 महिने दूध उत्पादकांना सांभाळण्याचे काम गोकुळने केले असल्याचेही शेट्टी म्हणाले.
कुणाचं काय चुकलं याचा पंचनामा करायची गरज नाही :
विचार करून आमचा निर्णय जाहीर करू, असे शेट्टींनी म्हटले होते. आज सत्ताधारी गटाला त्यांनी पाठिंबा जाहीर केला. मग नेमके विरोधकांचे काय चुकले आहे, असा प्रश्न विचारला असता राजू शेट्टी म्हणाले, कोणाचे काय चुकते याचा पंचनामा करायची गरज नाही. पण, आम्ही सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. शिवाय या सर्वच मंडळींनी चांगले काम केले आहे. चांगल्या गोष्टीला चांगले म्हटले पाहिजे, असे म्हणत आमचा मल्टिस्टेटला विरोध होता, त्यावर आम्ही नेहमी ठाम असणार आहे.
उमेदवारांनी 10 लिटर दूध न थकता काढून दाखवावे, असे राजू शेट्टी म्हणाले होते. याबाबत विचारले असता ते म्हणाले, विरोधी आणि सत्ताधारी गटातील एकही उमेदवार 10 लिटर दूध न थकता काढू शकत नाही. त्यामुळे मग आता आपण काय करायचे? निवडणूक पुन्हा घ्यायची का? असेही शेट्टी म्हणाले.
अशोकराव चराटी यांनीही दिला पाठिंबा :
आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह जिल्हा बँकेचे संचालक अशोकराव चराटी यांनी सुद्धा सत्ताधारी गटाला पाठिंबा दिला. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी विरोधी आघाडीला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आज त्यांनी सत्ताधारी गटाच्या आयोजित पत्रकार परिषदेत येऊन आपण महाडिक यांच्यासोबतच असल्याचे जाहीर केले. शिवाय पाहुणचार केला म्हणजे पाठिंबा नाही, असेही चराटी यांनी म्हटले.