कोल्हापूर - राधानगरी धरणाच्या वीज निर्मिती केंद्रात सोमवारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला. धरणाचे अतिरिक्त आपत्कालीन दरवाजे उघडल्यामुळे पात्रातील पाणी उफाळून वीज निर्मिती केंद्रात घुसल्यामुळे हा स्फोट झाला, असे बोलले जात आहे.
या ठिकाणच्या महापारेषणच्या ११० केव्हीचे अतिउच्चदाब उपकेंद्रांमध्ये कंबरेपर्यंत पाणी आल्यामुळे उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्व वाहिन्याही बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी वीज निर्मिती ठप्प झाली आहे. स्फोटामुळे महापारेषणकडून महावितरणच्या राधानगरी, सोळांकूर व कसबा तारळे ३३/११ केव्ही उपकेंद्रांना मिळणारा वीजपुरवठाही खंडित झाला आहे.
सध्या राधानगरी धरणाचे ३ व ५ क्रमांकाचे आपत्कालीन गेट प्रत्येकी ४ फुटांनी उचलले आहे. त्यामुळे आणखी ४ हजार क्युसेकने विसर्ग वाढला आहे. हा विसर्ग कमी करण्यासाठी पाटबंधारे विभागाला विनंती करण्यात येत आहे. तसेच वीज पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी दुसऱ्या मार्गाने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.