कोल्हापूर : दिलीप चौगुले आणि गणी तांबोळी हे गेल्या 35 वर्षांहून अधिक काळापासून मित्र आहेत. अगदी सुखदुःखामध्ये एकमेकांसोबत ठामपणे उभे असतात. सुरुवातीला गणी तांबोळी हे पान विकायचे तर दिलीप चौगुले यांचे पान शॉप होते. या व्यवसायातून दोघांची चांगली ओळख निर्माण झाली. ओळखीचे रूपांतर हे घट्ट मैत्रीत झाले आणि दोघांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मामू पान शॉप या नावाने व्यवसाय सुरू केला. गेल्या 23 वर्षांपासून ते या व्यवसायात आहेत. घरच्यापेक्षा जास्त वेळ ते एकमेकांसोबत असतात. एकमेकांशी चेष्टा, मस्करी करत सुखदुःख वाटून घेतात. यांच्यासोबतच यांच्या घरची मंडळी देखील एक परिवारासारखे राहतात.
भगवा गंध, पांढरी टोपी सोबतच : चौगुले आणि तांबोळी परिवारांमध्ये जात, धर्म हे कधीच आडवे येत नाही. अगदी रमजान असो किंवा दिवाळी दोघेही एकमेकांच्या सणात सहभागी होऊन सण साजरे करतात. एकाच्या कपाळावर भगवा गंध आणि दुसऱ्याच्या डोक्यावर गोल पांढरीशुभ्र टोपी असली तरी दोघांनीही बनवलेले पान मात्र जात आणि धर्माचा वास नसलेले एकरंगी दिसते. त्याप्रमाणेच सर्वांनी एकोप्याने राहावे असे दोघांनाही वाटते.
विवादित स्टेट्सवरून दंगल : गेल्या काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरात असे काही घडले की ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे स्टेट्स याचे कारण झाले. स्टेटस ठेवल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि कोल्हापूर बंदची हाक दिली. याचे दंगलीत रूपांतर झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या या दंगलीमुळे अनेकांचे नुकसान तर झालेच; मात्र दंगलीत सहभागी सुमारे चारशे युवकांवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. ज्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही दंगल सुरू झाली तेथेच अगदी हाकेच्या अंतरावर हे दोघेही जात-धर्म बाजूला ठेवून गेल्या 23 वर्षांपासून व्यवसाय करत आहेत. येथे येणारा प्रत्येक ग्राहक हा त्यांचा एकोपा पाहून कौतुक करतो तर अनेक पर्यटक देखील कुतुहलाने त्यांचे फोटो काढतात.
शाहू महाराजांच्या विचारामुळे एकोपा : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी दंगली होताना दिसून येत होत्या. मात्र, कोल्हापुरातील लोक ही शाहू महाराजांचे विचार घेऊन एकत्र राहत असल्याने याचा आदर्श राज्यातील अनेक जण घेतात. शहरात घडलेल्या दंगलीनंतर कुठेतरी शिवशाहूंच्या या विचारांना तडा गेला आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र चौगुले आणि तांबोळी यांच्यासारख्या अनेक व्यक्तींमुळे हे विचार अद्यापही टिकून आहेत आणि पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न होत आहे.
तरुणांनी मस्तक सशक्त करावे: इंटरनेटच्या मायाजाळात अडकलेले बहुतांश तरुण अशा प्रकारात विनाकारण अडकतात. अशा तरुणांनी छत्रपती शिवरायांचा पराक्रमी इतिहास वाचून आपले मस्तक सशक्त करावे. अशा जातीय भानगडीत न अडकता आपले भविष्य सक्षम करण्यावर भर देण्याचे आवाहन गणी तांबोळी आणि दिलीप चौगुले यांनी केले आहे.