कोल्हापूर - जिल्ह्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेल्या व राज्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेल्या सर्वांत मोठ्या डिजिटल शाळेची उभारणी करवीर तालुक्यातील कणेरीवाडीच्या विद्यामंदिरने केली आहे. शनिवारी (ता. १६) या शाळेचे उद्घाटन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते व पालकमंत्री सतेज यांच्या उपस्थित होणार आहे.
१९३० च्या दशकात देशात एका बाजूला स्वातंत्र्याचा लढा सुरू असतानाच दुसरीकडे कणेरीवाडी येथे शिक्षणाची ज्ञातज्योत पेटवण्याचे काम स्वातंत्र्यसैनिक तुकाराम रावजी मोरे गुरुजींनी केले. ९० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या शाळेने ही ज्ञानज्योत आजही धगधगत ठेवली आहे. आज जिल्ह्यात सर्वाधिक पट असलेली शाळा म्हणून ओळख बनली आहे. याहून अभिमानास्पद गोष्ट म्हणजे राज्यातील 'सर्वांत मोठी असलेली पहिली डिजिटल शाळा' म्हणून नावारूपाला आली आहे. अंतर्बाह्य नीटनेटकी शाळा, प्रशस्त व स्वच्छ मैदान असलेली शाळा, सर्व २४ वर्ग खोल्या डिजिटल असलेली शाळा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुणवत्तेतही सर्वोत्कृष्ट असणाऱ्या या शाळेलाही ग्रामस्थांनीही डिजिटल शाळा बनवण्यासाठी भरभरून मदत दिली. यातूनच शाळेचा कायापालट झाला.
हेही वाचा - जगासमोर आदर्श ठेवणारी जिल्हा परिषदेची 'झिरो एनर्जी शाळा'
१५०० कुटुंबाची प्रत्येकी ५०० रुपये मदत
हा मनोदय पूर्ण करण्यासाठी कणेरीवाडी ग्रामस्थांनी अथक प्रयत्न सुरू ठेवले होते. लॉकडाऊन काळात देखील घरटी ५०० व त्यापेक्षा अधिक लोकवर्गणी गोळा केली. एक, दोन नव्हे तर जवळपास १५०० कुटुंबांनी मदत केली आहे. तर, शिक्षकांनीही दीड लाखांची मदत केली.
मुख्याध्यापक राहुल ढाकणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुमार मोरे, उपाध्यक्ष रवींद्र खोत, सरपंच शोभा खोत, उपसरपंच अजित मोरे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने केलेले प्रयत्न व याला पाठिंबा देणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्यामुळे कणेरीच्या शाळेचा कायापालट झाला. खोत यांनी माजी विद्यार्थी, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन मंडळ, सीएसआर निधी या सर्वांतून शाळेचा विकास करण्याचा एक ध्यास घेतला होता. त्या माध्यमातून जवळपास ३५ लाखांचा निधी उभा केला. शासकीय निधीसह स्वत: पाच लाखांची वर्गणी देत संकल्प पूर्ण केला आहे.
डिजिटल शाळेचे स्वरूप
- २४ खोल्यांत ई-लर्निंग व्यवस्था
- वर्ग खोल्यात डिजिटल बोर्ड
- अंतर्बाह्य रंगरंगोटी
- वारली पेंटिंग
- बोलक्या भिंती
- ऑक्सिजन पार्क
- प्रयोगशाळा ग्रंथालय
- सुसज्ज संगणक लॅब
- सुसज्ज स्वच्छतागृहे
- कबड्डी, खो-खो, मल्लखांब तसेच विविध खेळांसाठी मैदान
- सर्व वर्गांत साउंड सिस्टीम
- सीसीटीव्ही कॅमेरे
- रेन वॉटर हार्वेस्टिंग
प्राणीमित्र, सर्पमित्रांचे नंबर भिंतीवर
शैक्षणिक ज्ञानासोबत प्राण्यांवर भूतदया दाखवण्याचा प्रयत्न या शाळेचा माध्यमातून केला जात आहे. जंगली प्राणी किंवा साप शहरी वस्तीत असल्यावर त्यांच्यावर हल्ला न करता त्यांना सुरक्षित स्थळी सोडण्याची व्यवस्था ताबडतोब व्हावी, या उद्देशाने भिंतीवर प्राणीमित्र व सर्पमित्रांचे फोन नंबर लिहले आहेत.
शाळेच्या भिंतीवर अवघे कोल्हापूर
विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील भोगोलिक परिस्थिती सोबतच, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील माहिती मिळावी यासाठी भिंतीवर विविध चित्रे रेखाटण्यात आली आहेत. शिवाजी विद्यापीठ, खासबाग मैदान, पन्हाळा, दूध कट्टा, ग्रामीण जीवनासह क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंची माहिती या भिंतीवर रेखाटली आहेत.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन
करवीर तालुक्यातील कणेरीवाडी येथील डिजिटल शाळेचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज (ता.१६) दुपारी १२ वाजता होणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होईल. कार्यक्रमास खासदार प्रा. संजय मंडलिक, जि.प.अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे, माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा - आदर्श शाळा म्हणून राज्यातील 300 शाळांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पाच शाळांची निवड