कोल्हापूर - पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरादरम्यान बंद असलेला पुणे-बंगळुरु महामार्ग सोमवारी काही प्रमाणात सुरू झाला आहे. महामार्ग ठप्प असल्याने कोल्हापूर जिल्ह्याचा आर्थिक कणा म्हणून ओळख असलेले गांधीनगर मार्केट हे पूर्णपणे बंद झाले होते. शहरांचे जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागले आहे. दरम्यान, पुरामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मागील आठवडाभर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना वेठीस धरणारा महापूर आता ओसरू लागला आहे. गांधीनगर मार्केटमधून राज्यभरातील बाजारपेठेत होणारा व्यापार गेले आठ ते दहा दिवस बंद होता. त्यामुळे या व्यापार पेठेला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.
बहुतांश भागांतील पाणी बुधवारपासून मोठ्या प्रमाणावर ओसरत आहे. परिस्थिती पूर्वपदावर यायला आणखी काही दिवस लागतील. या ठिकाणी तत्काळ लाईट आणि पाण्याची सोय करणे गरजेचे आहे. अन्यथा आगामी गणेशोत्सवाला मार्केटमध्ये मंदी जाणवू शकते, अशी भीती स्थानिक व्यापारी व्यक्त करत आहेत.