कोल्हापूर - ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या शिकवणीचा अभ्यास योग्य प्रकारे समजत नसल्याच्या दडपणातून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. मात्र, विद्यार्थ्यांनी आपले मनोबल वाढवायला हवे. कोणताही टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या पालकांचा विचार करायला हवा. आलेल्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी मनोबल वाढवावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
ऑनलाइन शिक्षणाचा अभ्यास समजत नसल्याने आलेल्या नैराश्यातून करवीर तालुक्यातल्या वाशी गावातील ऐश्वर्या बाबासो पाटील या विद्यार्थिनीचे आत्महत्या केली होती. ती बी फार्मसीचे शिक्षण घेत होती. या दुर्दैवी घटनेनतंर रविवारी स्वतः मंत्री उदय सामंत हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता, त्यांनी बाबासाहेब पाटील यांच्या घरी भेट देवून त्यांचे सांत्वन केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.
सामंत म्हणाले, झालेली घटना ही दुर्दैवी आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी येत्या 15 ते 20 दिवसांत प्राचार्य आणि शिवाजी विद्यापीठातील संबंधितांशी चर्चा करुन निर्णय घेवू. विद्यार्थ्यांनी कोणताही टोकाचा निर्णय घेताना आपल्या घरच्यांचा विचार करावा. आलेल्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी खचून न जाता मनोबल वाढवावे.
विद्यार्थिनी ऐश्वर्या ही बी-फार्मसीचे शिक्षण घेत होती. कॉलेज बंद असल्याने तिची सध्या ऑनलाईन शिकवणी सुरू होती. पाच-सहा दिवसांपासून तिने ऑनलाईन शिकवणीद्वारे अभ्यासाला सुरुवात सुद्धा केली होती. मात्र, त्यानंतर ती नैराश्यात गेली. ऑनलाइन शिक्षणाद्वारे अभ्यास समजत नसल्याने ती दडपणाखाली गेल्याचे पालकांना जाणवले होते. दरम्यान, गुरुवारी घरात कोणी नसल्याचे पाहून तिने फॅनला गळफास लावून घेतला. कुटुंबीयांनी तिला तात्काळ दवाखान्यात दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मंत्री उदय सामंत यांनी तिच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.