कोल्हापूर - शासनाने नाभिकांच्या हातातील वस्तारा काढून घेतला असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केले. 28 जूनपासून राज्यातील सलून सुरू करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, त्यामध्ये घालून दिलेल्या अटी पाहता अजूनही अडचणी येणार आहेत. केवळ केस कापता येणार आहेत. मात्र, ग्राहकांची दाढी करण्यावर मनाई करण्यात आली आहे. हे अतिशय चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शासनाने परवानगी देत असताना अशा अटी घालायला नको होत्या. कारण जेव्हा मध्यंतरी 10 दिवस सलून सुरू करण्यासाठी परवानगी दिली तेव्हा सर्व सलून मालकांनी स्वतःची तसेच ग्राहकांच्या सुरक्षेची काळजी घेतली होती. आम्हालासुद्धा आमच्या जीवाची काळजी आहे. त्यामुळे आम्ही सर्व नियम आणि काळजी घेऊन व्यवसाय करू पण कोणतेही निर्बंध आता शासनाने घालू नयेत असेही झुंजार यांनी म्हटले आहे.
आज शासनाने थ्रीडिंग आणि वॅक्सिंग करायला परवानगी दिली आहे. मात्र, दाढी करायला परवानगी दिली नाही. काम करायचे झाले तर कोणत्यातरी अटीमध्ये अडकवून विनाकारण लोकांच्या तोंडावर हात फिरवायचा आणि एखाद्या समाजाला आपण वेठीस धरलं नाही असं दाखवण्याचा प्रकार आहे असेही झुंजार यांनी म्हटले आहे. खरंतर महाराष्ट्रातील सर्वच नाभिक समाजाच्या आंदोलनांमुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, शासनाने आमच्यासाठी खूप काही प्रयत्न केले आहेत असे नाही. जोपर्यंत शंभर टक्के काम करायला परवानगी देत नाहीत, तोपर्यंत हे काम करायला काही अर्थही नसल्याचे सयाजी झुंजार यांनी म्हंटले आहे.