कोल्हापूर - गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला असून आज दिवसभरात 139 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय वारणा आणि राधानगरी धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. घाटावर आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात करण्यात आले आहे.
काल सकाळी दहा वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी 14 फूट होती. त्यामध्ये आज दहा फुटांची वाढ झाली असून सद्यस्थितीला पंचगंगा नदी 24.9 फुटांवरून वाहत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गतवेळच्या महापुराचा अनुभव आणि संभाव्य पूर धोका ओळखून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नदीच्या घाटावर आपत्ती व्यवस्थापना विभागाकडून 50 जणांचे एक पथकात तैनात करण्यात आले आहे. अशाच पद्धतीने पावसाचा जोर कायम राहिल्यास उद्या सकाळपर्यंत पंचगंगा नदी पात्राबाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे राज्यात बहुतांशी ठिकाणी मान्सून सक्रिय झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील 5 दिवस राज्यात सर्वत्र पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. कोकण आणि गोव्यात सह विदर्भाच्या काही भागात 18 तारखेपर्यंत 75 ते 100 टक्केपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.