कोल्हापूर - शहरासह जिल्ह्यात मंगळवारपासून (दि. 4 ऑगस्ट) मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला असून पाणीपातळीमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीचे पाणीसुद्धा बुधवारी (दि. 5 ऑगस्ट) सकाळी पात्राबाहेर पडले आहे.
मंगळवारी सकाळी राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी 21 फुटांवर होती. त्यामध्ये तब्बल 13 फुटांनी वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणी पातळी 34 फुटांवर पोहोचली आहे. धरणक्षेत्रासह घाटमाथ्यावरसुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 317 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या महापुराचा अनुभव पाहता आणि संभाव्य पुराचा धोका ओळखून यावर्षी जिल्ह्यातील आपत्ती यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पथके तैनात करण्यात आली आहे. शिवाय आपत्ती व्यवस्थापनकडे मोठ्या प्रमाणात बोट आणि इतर साहित्य सामाजिक संस्था आणि व्यक्तींकडून मिळाले आहे, तर काही गोष्टी स्वतः प्रशासनाने आणल्या आहेत. दरम्यान, शिरोळ तसेच आंबेवाडी, चिखलीमध्येसुद्धा पुराचा धोका ओळखून तेथील नागरिकांना सूचना येताच गाव खाली करून सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सद्याची पाणीपातळी 34 फुटांवर पोहोचली आहे. इशारा पातळी 39 फूट इतकी आहे तर धोका पातळी 43 फुटांवर आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पडलेला पाऊस आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुक्यानुसार आकडेवारी मिमीमध्ये -
हातकणंगले- 38.38 (267.25)
शिरोळ- 25.86 (225.14)
पन्हाळा - 88.29 (752.57)
शाहूवाडी - 64 (1011.83)
राधानगरी - 102.50 (1055.83)
गगनबावडा - 317 (2921)
करवीर - 70.27 (565.27)
कागल - 90.29 (753.29)
गडहिंग्लज - 55 (536.57)
भुदरगड -72.40 (856.60)
आजरा - 116 (1193.75)
चंदगड - 155 (1172.83)
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (आकडेवारी द.ल.घ.मी. मध्ये)
तुळशी - 61.33
वारणा - 745.42
दूधगंगा - 528.83
कासारी - 62.15
कडवी - 48.78
कुंभी - 62.52
पाटगाव - 81.77
चिकोत्रा - 23.93
चित्री - 34.35
जंगमहट्टी - 28.97
घटप्रभा - 44.17
जांबरे - 23.23
कोदे (ल. पा.) - 6.06
गत वर्षी पाऊस आणि अतिवष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे जिल्ह्यातील 386 गावे बाधीत झाली होती. यामध्ये कोल्हापूर शहर, शिरोळ तालुक्यातील - 42, हातकणंगले - 23, करवीर - 57, कागल - 41, राधानगरी - 22, गगनबावडा - 19, पन्हाळा - 47, शाहुवाडी - 25, गडहिंग्लज - 27, चंदगड - 30, आजरा - 30 आणि भुदरगड तालुक्यातील - 23 गावांचा समावेश आहे. या पूरबाधित गांवामध्ये पूरनियंत्रणाच्या दृष्टीने शोध व बचाव पथके सुद्धा स्थापन केली असून गाव ते जिल्हा पातळीवर प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्यात आल्या आहेत.
संभाव्य पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी उपलब्ध साधनसामुग्रीवर एक नजर
यामध्ये इन्फ्लेटेबल रबर बोट- ओबीएमसह - 8, रबर बोट जुन्या आणि नव्या मिळून 17, एअर पंप फॉर बोट- 6, टॉर्च सर्च लाईट- 40, लाईफ बाईज-30, सेफ्टी हेलमेट-50, मेगा फोन-21, फलोटींग पंप-7, स्कुबा डायव्हिंग सेट -2, लाईफ जॅकेट -200, लाईफ बॉय रिंग- 306, सर्च लाईट -20, हेड लाई विथ झुम – 10, फलोटींग रोप मिटर-100 , इन्फ्लेटेबल लाईफ जॅकेट -50, अंडर वॉटर सर्च लाईट-10 तसेच आस्का लाईट-18 यांचा समावेश आहे.
दरम्यान, ही साधनसामुग्री योग्य सुस्थितीत आहेत किंवा नाहीत याची खातरजमा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील स्वयंसेवी-सेवाभावी संस्था, आपदा मित्र अशा 808 स्वयंसेवकांचे बचाव पथक सुद्धा तैनात केला आहे. शिवाय एनडीआरएफची दोन पथकेही जिल्ह्यात दाखल झाली असून कोल्हापूर शहरात एक पथक आणि दुसरे पथक शिरोळ तालुक्यात तैनात करण्यात आले आहे.