कोल्हापूर - गोकुळ दूध उत्पादक संघाच्या सत्ताधाऱ्यांकडून केवळ राजकीय सुडापोटी राजकारण केले जात आहे. त्यामुळेच गोकुळला 55 कोटींचा आर्थिक फटका बसला असल्याचा आरोप गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केला आहे. आज(शुक्रवारी) निवडणुकीनंतर पहिल्यांदाच गोकुळची सर्वसाधारण सभा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाडिक यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांच्या कारभाराकडे बोट करत आरोप केले. केवळ चार महिन्यातच सत्ताधाऱ्यांनी अनेक निर्णय घाईगडबडीत घेतले असून आमचा त्या निर्णायांना विरोध असल्याचेही महाडिक म्हणाल्या.
मे महिन्यात कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची निवडणूक पार पडली. यामध्ये सत्ताधारी महाडिक गटाला धूळ चारत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने बाजी मारली. त्यानंतर गोकुळच्या अध्यक्षपदी विश्वास नारायण पाटील यांची निवड झाली. त्यानंतर निवडणुकीत दूध उत्पादक सभासदांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आणि संस्थेच्या दृष्टीने अनेक निर्णय घेतले. यातील काही निर्णयावर आतचा संचालक महाडिक यांनी प्रश्न उपस्थित करत विरोध केला आहे.
★ नेमके कोणते मुद्दे महाडिक यांनी केले उपस्थित?
1) 300 कोटींची जागा खरेदी करण्याची काहीही आवश्यकता नव्हती. गोकुळवर पहिल्यांदाच कर्जाचा काही प्रमाणात बोजा आहे. आता इतक्या मोठ्या रक्कमेची जागा खरेदी करून हा बोजा पुन्हा गोकुळवर पडणार आहे. या निर्णयाला आमचा विरोध आहे. आज होणारी सभा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे हा विषय पुढच्या सभेत ठेवावा अशी मागणी शौमिका महाडिक यांनी यावेळी केली.
2) वासाच्या दुधाचा मुद्दा, त्यावर डोंगळे यांनी आपलं मत व्यक्त केले आहे. त्यामुळे आता त्यावर काही बोलायची गरज नाही.
3) टाकळी येथील जे युनिट बंद केले ते फक्त राजकीय द्वेषापोटी निर्णय घेतला. ही बाब आता न्यायालयात आहे, त्यामुळे यावर जास्त बोलणार नाही योग्य न्याय मिळेल.
4) गोकुळच्या टँकरच्या मुद्द्यावर निवडणूक झाली, अनेक आरोप केले. मात्र त्यानंतर मी स्वतः खुलासे केले आहेत. गोकुळकडे लेखी खुलासे मागितले होते. त्यात व्यंकटेश्वरा प्रा. लिमिटेड कंपनीने कोणतेही आर्थिक गैरव्यवहार केले नसल्याचे गोकुळकडून कबूल करण्यात आले आहे, असेही महाडिक म्हणाल्या.
5) वाशी येथील 20 गुंठे जागा खरेदी केली आहे. तरीही आता 16 एकर जागा खरेदी करत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात जागेची काहीही गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
6) जे कर्मचारी कमी केले आहेत त्यांना तात्काळ पुन्हा घ्यावे. सध्याच्या कर्मचाऱ्यांवर त्यामुळे ताण पडत आहे, असे म्हणत याशिवाय अनेक कामे आहेत जी चुकीच्या आणि राजकीय द्वेषापोटी सुरू आहेत, असा आरोप सुद्धा महाडिक यांनी यावेळी केला.
हेही वाचा - निवडणुकीतील आश्वासन पूर्ण करत गोकुळ दूध खरेदीदरासोबत विक्रीदरात वाढ
हेही वाचा - बोरीवलीच्या घटनेवरून भाजपाचा दुटप्पीपण समोर आला आहे - सचिन सावंत