कोल्हापूर - कुस्ती म्हणजे लाल मातीतील रांगडा खेळ. याच लाल मातीला जागतिक अधिष्ठान मिळवून देणारे पहिले ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव. त्यांनी इंग्लंड येथील हेसलींकीमध्ये १९५२ साली झालेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये देशाला ऑलिंपिकमधील पहिलं कास्य पदक मिळवून दिले. तेच खाशाबा जाधव अजूनही पद्म पुरस्कारापासून वंचित आहेत. आतापर्यंत राज्यातील १८ आमदार, ११ खासदार, ३ राज्यमंत्री व ३ आजी माजी राज्यपालांनी पाठिंबा दिला. मात्र, आजही त्यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळालेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मागणी जोर धरू लागली आहे.
वर्ष १९५२ साली देशाला स्वातंत्र्य मिळून अवघी पाच वर्षे झाली होती. लोकशाहीचे बाळसे धरलेल्या आपल्या देशात सोयी-सुविधांची मात्र वानवा होती. या काळात कुस्तीपंढरी असलेल्या कोल्हापुरात खाशाबा जाधव नावाचे कवळे पोरं लाल मातीत घाम गाळत होते. देशाला ऑलिंपिकमध्ये पदक मिळवून देण्याचे स्वप्न उराशी बाळगून केलेला जीवतोड सराव १९५२ साली हेसलींकी येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत कास्य पदकाच्या रूपाने फळास आला. वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी खाशाबा जाधव यांनी देशाला पहिले ऑलिंपिक पदक मिळवून दिले. कुस्तीगीर खाशाबा जाधव आजपर्यंत देशाच्या सर्वोच्च अशा पद्म पुरस्कारापासून वंचित आहेत. आतापर्यंत ऑलम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या पंधरापैकी चौदा जणांना पद्म पुरस्कार मिळाला आहे. मात्र, या यादीत पहिले नाव असलेल्या खाशाबा जाधव यांच्या बाबतीत असा दुजाभाव का? असा सवाल कुस्तीगीर उपस्थित करत आहेत.
क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेतली जावी
एकूणच देशाला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणाऱ्या कुस्तीगीर खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार देऊन क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेतली जावी, अशी मागणी यानिमित्ताने जोर धरू लागली आहे. राज्य सरकारने पाठवलेल्या शिफारसींमध्ये पैलवान खाशाबा जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, आतापर्यंत त्यांनाही पद्म पुरस्कार का मिळाला नाही? हा सवाल मात्र अनुत्तरीत आहे. त्यामुळे आता सर्व सूत्र केंद्र सरकारकडून हलवली जाणार आहेत. त्यासाठी राज्यातील अनेक खासदार प्रयत्न करत आहेत.