कोल्हापूर - जिल्ह्यात आलेल्या महापुरात मोठ्या प्रमाणात पशुधनाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. आंबेवाडी, चिखली, आणि शिरोळ तालुक्यामध्ये पुराच्या पाण्यात मोठ्या संख्येने जनावरे मृत पावली. पुराचे पाणी ओसरल्यानंतर ही जनावरे उघड्यावर पडली आहेत. या जनावरांची विल्हेवाट लावण्याचे काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे.
अर्थमुव्हींग काँट्रॅक्टर्स अँड मशिनरी ओनर्स असोशिएशन, अर्थमुव्हर्स मशिनरी ओनर्स ग्रुपच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाने बुधवारी 87 म्हशी, 72 गायी, 19 वासरे आणि 51 शेळी-मेंढी असे एकूण 249 मृत जनावरांची शास्त्रीय दृष्ट्या विल्हेवाट लावली आहे. त्याचबरोबर आजरा येथील 3500, भुदरगडमधील 5800 आणि हातकणंगले मध्ये 3281 कोंबड्यांची विल्हेवाटही संबंधित ग्रामस्थांनी लावली आहे.
रेडेडोह परिसर, चिखली, वडंणगे, अंबेगाव परिसरातील रस्त्यांवर आणि गावांमध्ये मृत जनावरे पडलेली होती. आज जेसीबीच्या माध्यमातून खड्डे खोदून ब्लिचिंग पावडर, कार्बोलिक अॅसिडचा वापर करुन या मृत जनावरांची शास्त्रीय दृष्ट्या विल्हेवाट लावण्यात आली. परिसरात दुर्गंधी पसरु नये म्हणून गॅमेग्झिंन पावडर फवारण्यात आली आहे. जनावरांचे गोठे धुण्यासाठीचा सोडा, फिनेल सुद्धा आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले असून त्याचे वाटपही सर्वत्र सुरू करण्यात येत आहे.