कोल्हापूर Cycle Travel to Delhi : राज्यातील बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी कोल्हापुरातील 'जिद्द' बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र सुतार, शाखाध्यक्ष महादेव गवड हे थेट राजधानी दिल्लीपर्यंत सायकलवर प्रवास करणार आहेत. ते दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागण्यांचं निवेदन देणार आहेत. कोल्हापुरातील ऐतिहासिक पन्हाळगडावरुन 1675 किलोमीटरच्या सायकल प्रवासाला सुरुवात झालीय.
रखडलेल्या प्रश्नांसंदर्भात निवेदन : राज्य सरकारनं असंघटित बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार महामंडळ स्थापन केलंय. या महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील बांधकाम कामगारांना राज्य शासनाच्या योजनेचा लाभ होतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बांधकाम कामगार राज्य शासनाच्या या योजनांपासून वंचित राहत आहेत. बांधकाम कामगाराच्या नोंदणीपासून ते लाभार्थी होईपर्यंत दलाली सुरु असल्याचा आरोप या कामगार संघटनेनं केला आहे. याबद्दल वारंवार जिल्हा प्रशासन, राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊनही कारवाई होत नाही. या प्रकाराला वैतागलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील देवळे गावचे रहिवासी असलेले आणि जिद्द बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र सुतार, शाखाध्यक्ष महादेव गवड यांनी बांधकाम कामगारांच्या मागण्या, गायरान अतिक्रमण, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या व्यथा, महावितरणबद्दल तक्रारी, मराठा आरक्षण या मागण्यांचं निवेदन सायकलनं प्रवास करत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत हे निवेदन पोहोचवणार आहेत. त्यांच्या या 1675 किलोमीटरच्या प्रवासाला ऐतिहासिक पन्हाळगडावरुन सुरुवात झालीय.
22 दिवस 1675 किलोमीटरचा प्रवास : राज्यातील बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारनं बांधकाम कामगार मंडळाकडून अनेक योजना लागू केल्या आहेत. मात्र, अजूनही बांधकाम कामगारांना मेडिक्लेम योजना लागू करण्यात आलेली नाही. बांधकाम कामगारांच्या मुलांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नाही. यासह अनेक प्रश्न बांधकाम कामगारांचे प्रलंबित आहेत. याविषयी कोल्हापूरचे राजेंद्र सुतार हे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबतचं निवेदन देणार असल्यानं बांधकाम कामगारांचे प्रश्न आता तरी मार्गी लागतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा :