कोल्हापूर - कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी आपलं घरदार विसरून परिस्थिती हाताळत आहेत. नागरिकांना वारंवार पोटतिडकीने नियम पाळण्यास सांगत आहेत. मात्र, आज (बुधवार) कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला आणि याचा विसर कोल्हापुरकरांना पडला. ऐतिहासिक तलाव सांडव्यावरून वाहताच अनेकांनी याकडे धाव घेतली आणि पडणाऱ्या पाण्यात आनंद लुटला. विशेष म्हणजे अनेकांनी सामाजिक अंतर, मास्क वापरला नाही. त्यामुळे आधीच कोरोनाचा सामना व महापुराचा उंबरठ्यावर असताना कोल्हापुरकरांना पर्यटनाची मौजमस्ती सुचते कशी, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे कळंबासारख्या गावात कोरोनाचे रुग्ण अधिक आहेत. तरीदेखील हा धोका नागरिकांनी स्वीकारला.
सध्या कोल्हापुरात दिवसेंदिवस कोरोनाबधितांचा आकडा वाढत आहे. ही परिस्थिती रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिकासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यंत्रणा गतिमान झाल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत 'कोरोनाचा तटवाय लागतंय' हीच भूमिका प्रशासनाची राहिली आहे. जीवाची पर्वा न करता डॉक्टर्स, नर्सेस, पालकमंत्री जिल्हाधिकारी, आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख रात्रंदिवस प्रत्येक गोष्टीचा आढावा घेत आहेत. हे संकट असताना कोल्हापुरवर पुन्हा महापुरासारख्या संकटाचे ढग दाटून आले आहेत. या दुहेरी संकटाचा सामना करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर येणार आहे.
आधीच कोरोनाने यंत्रणेवर ताण आहे. तरीदेखील हे सर्व अधिकारी या नव्या संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज झालेत. मात्र, या संकटात झारीचा शुक्राचार्य कोल्हापुरचे नागरिक बनत आहेत की काय, असा प्रश्न पडत आहे. आज दुपारी कळंब तलाव ओव्हरफ्लो झाला. ही घटना सोशल मीडियावरून वाऱ्यासारखी शहरभर पसरताच नागरिकांनी कळंबा तलावाकडे धाव घेतली. सांडव्यावरून वाहत असलेल्या पाण्यात मौज मस्ती केली. मात्र, कोरोनासारखा महाभयंकर आजार आपल्या जवळ असताना, त्याची कोणतेही तमा न बाळगता मनसोक्त आनंद लुटण्यात अनेकजण व्यस्त होते. अशावेळी सामाजिक अंतराचा विसर लोकांना पडला व अनेकांनी जवळ मास्कदेखील बाळगले नव्हते. मग या लोकांना आता काय म्हणावे असा सवाल उपस्थित होतो. तर, जिल्हा प्रशासनाच्या नावाने बोंब मारणाऱ्या अनेकांनी अशा बेजबाबदार नागरिकांबाबत काय भूमिका घ्यावी, हे देखील स्पष्ट करण्याची गरज आहे.
दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवरा यांनी मंत्रालय नियंत्रण कक्षास भेट देऊन कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या पूर परिस्थितीची माहिती घेतली. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच जनतेला घरातच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. तर, कोल्हापूर परिसरात दिवसभरात सूरु असलेल्या जोरदार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती पुनर्वसन दलाच्या दोन तुकड्या कोल्हापूरसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
कोल्हापूरमधील पावसाची स्थिती लक्षात घेऊन राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या समवेत बैठक घेतली. यावेळी एनडीआरएफच्या दोन तुकड्या कोल्हापूरला पाठविण्या बाबत मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी देखील कोल्हापूरसाठी तत्काळ तुकड्या रवाना करण्याचे निर्देश दिल्याचे राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी सांगितले.