कोल्हापूर - खुनाच्या प्रयत्नासह मारामारीच्या गुन्ह्याचे खटले असलेल्या सराईत गुन्हेगार प्रथमेश प्रकाश चव्हाण हा गजाआड झाला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचून त्याला गारगोटी बसस्थानकाच्या परिसरातून ताब्यात घेतले. या कारवाई दरम्यान त्याच्याकडून गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे असा 30 हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
संशयित चव्हाण कमरेला पिस्तूल लटकावून गारगोटी परिसरात दहशत निर्माण करत होता. शस्त्राच्या बळावर त्याने परिसरात दहशत निर्माण केली होती. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना चव्हाण याच्या कारनाम्याचा सुगावा लागताच पथकाने आज सकाळी सापळा रचून संशयिताला गारगोटी बस स्थानकाजवळ ताब्यात घेतले. झडतीत पिस्तूल, काडतुसे आढळली. तेव्हा पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, उपनिरीक्षक दादाराजे पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. चव्हाण यांच्यावर 2017 मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा दाखल आहे.
महत्वाचे म्हणजे प्रथमेश याच्या अटकेने त्याचे कोल्हापुरातील सराईत गुन्हेगार योगेश बाळासाहेब राणे आणि विशाल बाजीराव पाटील याच्या टोळीशी कनेक्शन असल्याचे उघडकीस आले आहे. टोळीचा म्होरक्या योगेश राणे याच्या ताब्यातील हे पिस्तूल विशाल पाटीलमार्फत ऑगष्ट 2018 मध्ये प्रथमेश चव्हाण याला पुरविण्यात आले होते. अशीही माहिती चौकशीत पुढे आली आहे. यामुळे 'त्या' तिघाविरुध्द भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.