कोल्हापूर - जिल्ह्यात आता कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. दररोज 200 च्या आसपास रुग्ण आढळत असून 4 ते 5 रुग्णांचा मृत्यू होत आहे. सद्या जिल्ह्यात 1 हजार 540 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर 1 हजार 800 रुग्णांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर 'ब्रेक द चेन' अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 या वेळेत लॉकडाऊन असणार आहे. शिवाय इतर दिवशी सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. या दरम्यान, केवळ अत्यावश्यक सेवा वगळता कोणतेही व्यवसाय, आस्थापना सुरू करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या 40 लाखांच्यावर
जिल्ह्याची लोकसंख्या तब्बल 40 लाखांहून अधिक आहे. लोकसंख्येचा विचार केल्यास जिल्ह्यात आजपर्यंत 53 हजार 440 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 50 हजार 100 रुग्ण बरे झाले आहेत तर 1 हजार 800 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 540 इतकी आहे. जिल्ह्यात तब्बल 2 हजार 500 बेडची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यामध्ये 1 हजार 417 रेग्युलर बेड, ऑक्सिजन बेड 990, आयसीयू बेड 227 आणि व्हेंटिलेटर बेडची संख्या 202 इतकी आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात बेड बाबत कोणतीही अडचण नाही.
वीकेंड लॉकडाऊन
दरम्यान आज शुक्रवारी रात्री आठ पासून सोमवार सकाळी सात वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गेल्या दोन दिवसांपासूनच किरकोळ खरेदी करून ठेवली आहे. दोनच दिवस लॉकडाऊन असल्याने बाजारात खरेदी करण्यासाठी गर्दीही झाल्याचे पाहायला मिळाले नाही.
अनेक ठिकाणी रुग्णसंख्येत होतेय वाढ
कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील प्रमाण कमी असून नगरपालिका आणि कोल्हापूर शहरातील रुग्णसंख्येत मात्र प्रचंड वाढ होत आहे. कोल्हापुरातील इचलकरंजी शहरात सुद्धा रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे या ठिकाणी कंटेंटमेन्ट झोन बनले आहेत.
लॉक डाऊन दरम्यान या सेवा सुरू असणार
मेडिकल, जनावरांचे दवाखाने, किराणा दुकान, धान्य दुकान, गॅस सिलेंडर पुरवठा, पेट्रोल पंप, सर्व प्रकारच्या कार्गो सेवा, डेटा सेंटर, शासकीय आणि खाजगी सुरक्षा सेवा, फळविक्रेते, अन्न आणि त्याच्याशी निगडित सर्वच सेवा, अंडी आणि मांस विक्री व्यवसाय आदी गोष्टीचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात औषध पुरवठा सुद्धा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे सद्या तरी कोणत्याही पद्धतीने औषध टंचाई कोणाला भासली नाही.