कोल्हापूर - राज्यात आजपासून संचारबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कोल्हापूर शहरात देखील या संचारबंदीला सुरवात झाली असून जिल्ह्यात पोलीस बंदोबस तैनात करण्यात आला आहे. मात्र, नागरिक खुलेआम रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र आहे. तर, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. कोल्हापुरात संचारबंदीची नेमकी काय परिस्थिती आहे? याचा ड्रोन कॅमेराद्वारे आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राहुल गडकर यांनी...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'ब्रेक दी चेन' अंतर्गत दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन झाल्यानंतर राज्यात आजपासून १ मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व आस्थापने, दुकाने बंद राहणार आहेत. शिवाय फेरीवाले, भाजीपाला व्यवसाय करण्यास सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत परवानगी आहे. मात्र, सामान्य नागरिकांना मुक्तपणे संचार करता येणार नाही. काल(बुधवार) रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू झाली आहे. आज सकाळीची परिस्थिती पाहता कोल्हापूरकरांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे. गेल्या चोवीस तासांत कोल्हापूर जिल्ह्यात ३८८ नवीन कोरोना रूग्ण सापडले आहेत. सध्या उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या २ हजार ७४६ इतकी आहे.
पोलीस अधीक्षकांनी दिला कारवाईचा इशारा -
पोलीस प्रशासनाने देखील कडक अंमलबजावणी सुरूवात केली आहे. शहरातील प्रमुख चौकात तसेच तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. जवळपास अडीच हजार पोलीस रस्त्यावर आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी दिला आहे. मात्र, काही ठिकाणी पोलीस मवाळ भूमिका घेत कारवाई करत नाहीत.
फेरीवाले आणि भाजीवाले रस्त्यावर -
या संचारबंदीत हातगाडीवाले, फेरीवाले, भाजीवाले यांना व्यवसाय करण्यास परवनागी दिली आहे. अशा व्यवसाय धारकांना केवळ ग्राहकांना घरात जाऊन सेवा द्यायची आहे. शिवाय गेल्या चार दिवसापासून महापालिकेकडून ज्या फेरीवाल्यांची कोरोना चाचणी व लसीकरण झाले आहे. अशा फेरीवाल्यांनाच व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे. असे असतानाही काही ठिकाणी फेरीवाले आणि भाजीवाले रस्त्यावर भाजी विकण्यास बसले आहेत. शिवाय नागरिकांनी देखील खरेदीसाठी झुंबड उडवली आहे. त्यावर महापालिका प्रशासनाने कोणतेच नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.
सार्वजनिक वाहतुकीला परवनागी असणार आहे. मात्र, सामान्य नागरिकांना प्रवास करण्यास बंदी आहे. महानगरपालिकेच्या केएमटी बस, एसटी यातून केवळ अत्यावश्यक सेवेतील आणि दुकानांतील कर्मचारी, बँक कर्मचारी, फळ-भाजी विक्रेते, आरोग्य कर्मचारी, सरकारी कर्मचारी यांना प्रवास करण्यास मुभा असणार आहे.
कोल्हापूर कृषी बाजार उत्पन्न समितीमध्ये सोशल डिस्टन्सचा फज्जा -
राज्यात संचारबंदी नियम लागू असले तरी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र, याचा काहीही परिणाम झाला नसल्याचे दिसले. फळभाजी विक्रेते तसेच आडते यांनी देखील गर्दी करून 'ब्रेक दी चेन'च्या नियमांना हरताळ फासला आहे. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने देखील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीच उपाय योजना केली नसल्याचे दिसून आले.