कोल्हापूर - कोरोनानंतर राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण सापडल्यानंतर त्याची धास्ती जिल्ह्यांतील आरोग्य विभागासह कर्नाटक राज्यानेही घेतली आहे. कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी पुन्हा कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. आरटीपीसीआरचा अहवाल नसेल तर अँटिजन टेस्ट बंधनकारक केली आहे. तर कर्नाटकातून महाराष्ट्रात येत असताना केवळ ई-पास व आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र तपासले जात आहे.
कोरोनाच्या डेल्टा प्लसचा धसका कर्नाटक राज्यातील सरकारने घेतला असून कोगणोळी टोलनाक्यावर पोलिसांनी कसून तपासणी सुरू केली आहे. केवळ 48 तासातील आरटीपीसीआर चाचणीचे निगेटीव्ह अहवाल असेल तरच कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे. आरटीपीसीआरचा अहवाल नसेल तर अँटिजन चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तशी व्यवस्था सीमेवर केली आहे. एखादा नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला रुग्णालयात पाठवण्याच्या सूचना कर्नाटक सरकारने दिल्या आहेत.
- कर्नाटककडून कोल्हापूर, साताऱ्याकडील बससेवा बंद
राज्यातील कोरोनाची परिस्थिती वाढत असताना कर्नाटकाकडून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व बसेस बंद केल्या होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारने कर्नाटकातून कोल्हापूर, साताऱ्याकडे जाणारी बससेवा सुरू केली होती. पण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्याने कर्नाटक सरकारने त्याची धास्ती घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्नाटक सरकारने कोल्हापूर-सातारा बस सेवा बंद केली आहे.
- महाराष्ट्र सीमेवर कागल येथे तपासणी
कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरचा कागल येथे पोलीस प्रशासनाकडून ई-पास व आरटीपीसीआर चाचणीची तपासणी केली जात आहे. मात्र, अँटिजन टेस्टची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.
- कर्नाटक व कोकणातून येणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी करा - मुश्रीफ
कर्नाटकातून व कोकणातून येणाऱ्यांची तपासणीसाठी कागल येथे कोरोना तपासणी केंद्र उभारा, असे आदेश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिले आहेत. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह येईल त्यांनाच कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश द्या, ज्यांचा पॉझिटिव्ह येईल त्यांना परत पाठवा, अशा सूचनाही ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.
- कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येवर एक नजर
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राज्यात सर्वात उशिरा कोरोनाची दुसरी लाट आली. सद्यस्थितीत एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 54 हजार 332 वर पोहोचली आहे. त्यातील 1 लाख 37 हजार 673 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आत्तापर्यंत 4 हजार 683 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 976 वर पोहोचली आहे.
हेही वाचा - कोल्हापुरात कोरोनाचा धोका कायम तरीही व्यापारी व्यवसाय सुरू ठेवण्यावर ठाम