कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातही कोरोना विषाणू सदृश रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वाघवे येथील ऋतुजा शेलार आणि गारगोटीच्या किरण शिंदे यांचा विवाहसोहळा अवघ्या 20 लोकांच्या उपस्थितीत करण्यात आला.
गेल्या 1 महिन्यापासून दोन्ही कुटुंबातील मंडळी लग्नाच्या तयारीत व्यग्र होती. गारगोटी येथील मंगल कार्यालयात मोठ्या थाटा-माटात हे लग्न पार पडणार होते. पण कोरोनाने भारतात प्रवेश केला आणि दोन्ही कुटुंबीयांच्या मोठ्या थाटात लग्न करायचे स्वप्न फक्त स्वप्नच राहिले. केवळ 20 ते 25 जणांच्या उपस्थितीतच हा लग्न सोहळा पार पाडण्याची यांच्यावर वेळ आली. विशेष म्हणजे नवरदेव किरण शिंदे यांचे स्वतःचे मंगल कार्यालय आहे. पण, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेत केवळ मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा उरकला.
हजारो लोकांच्या उपस्थितीत अनेक लग्ने लावली. मात्र, केवळ 20 ते 25 नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा एकमेव लग्नसोहळा होता असे पुरोहितांनी म्हटले. शेलार आणि शिंदे कुटुंबीयांनी मनावर दगड ठेऊन मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मतदारसंघातील आमदार प्रकाश आबिटकर यांनी या लग्नाला उपस्थिती लावली. दोन्ही कुटुंबीयांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत घेतलेल्या निर्णयाबाबत त्यांचे कौतुक करत नव वधू-वरांना आशीर्वाद दिले.
शेलार आणि शिंदे कुटुंबीयांप्रमाणे प्रत्येकाने अशाच पद्धतीने सामाजिक भान राखत, आपली जबाबदारी पार पाडली तर कोरोनारूपी संकटावर मात करण्यास मोठी मदत ठरू शकेल यात शंका नाही.
हेही वाचा - कोल्हापुरात दारुच्या नशेत मुलाकडून आईची हत्या