कोल्हापूर: कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमचे पाणी इचकरंजीला देणार नाही असे नेत्यांनी स्पष्ट केले असून या योजनेला त्वरित स्थगिती द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. इचलकरंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी दुधगंगा नदीतून सुळकुड पाणी योजना राबवली जात होती; पण या योजनेला दूधगंगा काठावरच्या ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत लढा उभारला. त्यामुळे कागल मधील लोकप्रतिनिधींनी देखील या योजनेला तीव्र विरोध केला आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या बैठकीत ग्रामस्थांसह कागल तालुक्याचे आमदार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी या योजनेला विरोध केला.
काय म्हणाले हसन मुश्रीफ? कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या उपस्थितीत झालेल्या आजच्या बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधींनी इचलकरंजी सुळकूड योजनेला विरोध केला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लोकभावना सरकारला कळवू असे सांगितले. तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुळकुड पाणी योजना ही इचलकरंजीसाठी संयुक्तिक होणार नसल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर काळम्मावाडी धरणाचे पाणी हे लाभक्षेत्रातील लोकांनाच पुरत नाही, त्यामुळे एक थेंबही पाणी आम्ही इचलकरंजी शहराला देणार नाही आणि पाणी मागण्यासाठी इचलकरंजी मधील लोक आमच्याकडे येऊच नये, असे ठणकावून सांगितले. ही योजना रद्द व्हावी यासाठी मुख्यमंत्री यांना विनंती करणार असल्याचे देखील मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
तर कर्नाटकात सामील होऊ: या बैठकीला दूधगंगा पाणी बचाव समितीचे सदस्य देखील उपस्थित होते. आठ दिवसांपूर्वीच कागल तालुक्यातल्या नागरिकांनी एक बैठक घेऊन कागल मधील नेत्यांनी आमच्या या हक्काचे पाणी देण्यासंदर्भात विरोध केला नाही तर आम्ही कर्नाटकात सामील होऊ असा सज्जड इशाराच दिला होता. त्यानंतर तालुक्यांतील सर्व नेते एकवटले असून आता त्याला शेतकऱ्यांसह नेत्यांचाही मोठा विरोध पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, आज पार पडलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला मंत्री हसन मुश्रीफ आणि यांचे कट्टर विरोधक असलेले भाजप नेते समरजितसिंह घाटगे हे दोघेही एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. दोघांचीही भूमिका एकच होती यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.