कोल्हापूर - तब्बल 15 लाख लिटर दररोजचे दूध संकलन असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दूध संघाच्या म्हणजेच 'गोकुळ'च्या निवडणूक कार्यक्रमास सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार उद्यापासून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरू होणार आहे. 20 एप्रिल पर्यंत माघारीची मुदत आहे. 2 मे रोजी मतदान तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, गोकुळच्या निवडणूक स्थगितीसाठी सत्तारूढ गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. आज यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे अवघ्या जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सत्तारुढ गटासमोर पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी मिळून जाहीर केलेल्या राजर्षी शाहू आघाडीने मोठं आव्हान निर्माण केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गोकुळवर आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता आहे. गेल्या वेळच्या पंचवार्षिक निवडणुकीत सतेज पाटील यांनी अनेकांचा पाठिंबा नसून सुद्धा सत्तारुढ गटाला टक्कर दिली होती. मात्र आता सत्तारुढ गटातील अनेक संचालक फुटून विरोधी बाकावर आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अधिकच रंगत आली असून आता हालचालींना वेग आला आहे. सर्वांनीच एकमेकांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत काय होणार हेच पाहावे लागणार आहे.
करवीर प्रांताधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करता येणार :
करवीर प्रांताधिकारी कार्यालयामध्ये उद्या 25 मार्च पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 1 एप्रिल अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर 5 एप्रिलला अर्जांची छाननी करून, पात्र उमेदवारांची यादी 6 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम :
- उमेदवारी अर्ज दाखल करणे - 25 मार्च ते 1 एप्रिल
- उमेदवारी अर्जांची छाननी - 5 एप्रिल
- पात्र उमेदवारांची यादी - 6 एप्रिल
- अर्ज माघारी घेण्याची मुदत - 6 एप्रिल ते 20 एप्रिल
- उमेदवारांची अंतिम यादी तसेच चिन्हे वाटप - 22 एप्रिल
- मतदान - 2 मे
- मतमोजणी - 4 मे