कोल्हापूर: आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या दुपारी ४ वाजता पेटाळा येथे शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना आणि शिवसैनिकांच्या मेळाव्यातून संवाद साधतील. यासाठी मंडप उभारणीचे काम सुरू आहे. दरम्यान या मंडप उभारण्याची पाहणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच पक्ष आतापासून तयारीला लागले आहेत. अशातच शिवसेनेला कोल्हापूर हा नेहमीच महत्त्वाचा जिल्हा असल्याने शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देखील आपल्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापूर जिल्ह्यातून करायचे; मात्र, शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह आपल्याकडे घेतले. तर जिल्ह्यातील दोन्ही खासदार आणि आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. यामुळे ठाकरे गटाला येथे फटका बसला. मात्र, आगामी निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या दोन्ही खासदार आणि आमदारांना कोणत्याही परिस्थितीत जिंकू द्यायचं नाही असा चंग बांधून बसलेल्या ठाकरे गटाने लोकसभेची तयारी आतापासूनच सुरू केली आहे.
शिवसेनेचे विविध मंत्री उपस्थित राहणार: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने देखील तयारीला सुरुवात केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महिनाभरातील कोल्हापूरचा हा दुसरा दौरा असून या दौऱ्यातून ते लोकसभा आणि विधानसभेच्या अनुषंगाने शिवसैनिकांचा मेळावा घेणार आहेत. तब्बल दहा हजार लोक बसण्याची क्षमता असलेल्या या पेटाळा मैदानावर उद्या संध्याकाळी 4 वाजता मेळावा सुरू होणार आहे. यासाठी भव्य मंडप आणि स्टेज उभारण्याचे काम जोमात सुरू आहे. तर या तयारीची पाहणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली. या मेळावाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधणार तसेच मेळाव्यास शिवसेनेचे विविध मंत्री, खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचेही राजेश क्षीरसागर यांनी सांगितले आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित ठेवायचाय: राज्याच्या राजकारणात सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्याने शिंदे गट नाराज झाला आहे. दरम्यान खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार अद्याप देखील प्रलंबित आहे. मात्र, आमचे नेतृत्व ठाम आहे. मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील, असे राजेश क्षीरसागर यावेळी म्हणाले आहेत. तसेच बारा आमदारांच्या यादी बाबत त्यांना विचारले असता मुख्यमंत्री महोदय हे फार जाणते मुख्यमंत्री आहेत. त्यांना माहीत आहे की, कोल्हापूर किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेवर कुणाला स्थान द्यायचे. 6 आमदार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निवडून आलेले असताना 2014 ला शिवसेनेची सत्ता आलेली असताना एकालाही आमच्यातला कोणाला मंत्री केला नाही. पश्चिम महाराष्ट्रातील एकाला 12 आमदारांच्या यादीत स्थान देतील, असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा:
- Sushilkumar Shinde On Award : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंचे मौन; तीन वेळा म्हणाले...
- Ambadas Danve Criticized Mahayuti : शिंदे, पवार गटावर गद्दारीचा शिक्का - अंबादास दानवे
- Bachchu Kadu On CM : मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर भूमिका जाहीर करणार - आमदार बच्चू कडू