कोल्हापूर - सरकार चालवण्यासाठी ५६ पक्ष नाहीतर ५६ इंचाची छाती लागते अशी टीका आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी युतीच्या पहिल्याच प्रचारसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली. काही लोकांनी ५६ पक्ष एकत्र आणलेत पण त्यांची नोंदणी तरी आहे का? ५६ पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही. त्यासाठी मोदींसारखा नेता हवा, असे ते यावेळी म्हणाले.
आमची युती इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनी तर तुमची राष्ट्रवादी भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी आहे का? असा सवाल त्यांच्याकडून यावेळी विचारण्यात आला. आघाडीकडून १५ वर्षात जे झाले नाही ते आम्ही साडेचार आम्ही करून दाखवले. युतीचे वातवरण पाहून राष्ट्रवादीचे कॅप्टन असलेल्या पवारांनी माघार घेतली असल्याचा टोलाही फडणवीसांनी यावेळी लगावला.
यावेळी त्यांनी राज ठाकरेंवरही निशाणा साधला. अलीकडे काही दिवसांपासून पोपटही बोलू लागला. बारामतीच्या पोपटाच्या अंगावर एकही कपडा उरलेला नाही. आमचे कपडे उतरवणारा अजून जन्माला यायचा आहे. विधानसभा निवडणुकीत, महापालिका निवडणुकीत त्यांचे कपडे उतरवले आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्यांची लंगोटही उतरवली आहे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी राज यांचे नाव न घेता लगावला.
आमचा हिंदूत्ववाद जात धर्माच्या समोरचा आहे. भाजपा-शिवसेना युती फेव्हिकॉलची जोड आहे. त्यामुळे ती कधी तुटणार नाही. ही विचारांची युती आहे. ही हिंदुत्ववादाची युती आहे. महायुतीच्या प्रचाराचा नारळ आज (रविवार) कोल्हापूर येथील तपोवन येथे फोडण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत आदींसह भाजपा-शिवसेनेचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.