कोल्हापूर - समजा माझ्या पत्नीने उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. तरीही मी शिवसेनेच्याच उमेदवाराचा प्रचार करणार, असे वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ते आज कोल्हापूरच्या मुरगूडमधील शिवसेना-भाजपच्या मेळाव्यात बोलत होते.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. त्याठिकाणी शिवसेनेचे संजय मंडलिक लोकसभा लढवणार आहेत. सेना-भाजपची युती झाल्यानंतरही चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना मदत करतील, अशी चर्चा सुरु झाली. मात्र, या सगळ्या चर्चेला आज दादांनी उत्तर देऊन शांत केले.
महाडिक यांच्यासोबतची मैत्री वैगरे बाजूला आधी युतीचा धर्म पाळला जाणार असल्याचेही वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी यावेळी केले आहे. शिवाय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी संजय मंडलिक यांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.