कोल्हापूर - जुने विषय आता काढायचे काहीच कारण नव्हते. बंगल्यांचे विषय कधीच बंद झाले होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ( Rashmi Thackeray ) आणि आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांना बदनाम करून उद्धव ठाकरे यांना त्यांची खुर्ची खाली करण्यासाठी भाग पाडायचं आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP Leader Chandrakant Patil ) यांनी दिली. तसेच शिवाय विरोधकांना उसवून संजय राऊत यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचा आहे की काय, असा टोलाही त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला. ते कोल्हापूरात बोलत होते.
'आमच्या नेत्यांवर आरोप झाल्यावर आम्ही बोलायचे नाही?'
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मला अमोल काळे कोण हे माहिती नाही आणि त्याच्यावर काय आरोप आहेत, हे सुद्धा माहिती नाही. मात्र, मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे. माझा आणि संजय राऊत किंवा शरद पवार यांच्या बांधाला बांध नाही, त्यामुळे वैयक्तिक वादाचे काही कारण नाही. मात्र, किरीट सोमैया, फडणवीस हे आमचे नेते आहेत. त्यामुळे यांच्यावर आरोप केल्यावर मी बोलायचं नाही का?, 27 महिने तुमचीच सरकार आहे. इतके वर्षे काय झोपा काढत होता काय?, असा सवाल सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित करत ते पुढे म्हणाले, आपण सरकारकडे तक्रार करावी आणि 27 महिने या गोष्टी तुम्हाला माहीत नव्हत्या का? तुमच्या गळ्याशी आल्यानंतर हे सगळं तुम्हाला आठवतं का? तुम्ही भाजपच्या नेत्यांवर आरोप केल्यावर मी शांत बसायचं हे कसं होईल म्हणत त्यामुळे आमच्या नेत्यांना बोललेलं खपवून घेणार नाही, असाही दम सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना दिला.
'अब्रुनुकसानीच्या दाव्यांच्या हेलपाट्याने तुम्ही मरणार'
यावेळी चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, न्यायालयाने अनेक प्रकरणांत तुम्हाला तोंडावर आपटले आहे. तरीही तुम्हाला समजले नाहीये. आता ज्यांच्यावर आरोप करत आहेत, ते सोमैया, काळे आदी सुद्धा न्यायालयात जातील आणि पुन्हा तुम्ही तोंडावर आपटणार. हे सगळे भांबावून गेल्याने त्यांना काही कळत नाही आहे. राऊत यांनी तर आपली पातळी सुद्धा खालावली असून घाणेरडी भाषा वापरत आहेत. त्यामुळे आता तुमच्यावर एव्हडे अब्रुनुकसानीचे दावे होतील, ज्या दाव्यांच्या हेलपाट्यानेच तुम्ही मारणार, अशा कडक शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांचा समाचार घेतला.