कोल्हापूर : कोल्हापुरातील पंचगंगा नदीचा घाट उद्या पहाटे हजारो पणत्यांनी उजळून निघणार आहे. कोल्हापुरातील विविध सामाजिक सेवा संस्था आणि नागरिकांच्यावतीने दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त ( Occasion on Tripurari Poornima ) पंचगंगा नदी घाटावर ( Panchganga river ghat in kolhapur ) हजारो पणत्या प्रज्वलित करुन आनंद साजरा केला जातो. बोचरी थंडी असतानाही मिण-मिणत्या हजारो पणत्यांचा आनंद लुटण्यासाठी कोल्हापूरकर दरवर्षी पंचगंगा घाटावर मोठी गर्दी करत असतात. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे तो उत्साह साजरा करता आला नाही, मात्र उद्या मोठ्या उत्साहात हा दीपोत्सव साजरा होणार असल्याची संयोजकांनी माहिती दिली आहे.
22 वर्षांपासूनची परंपरा - त्रिपुरारी पौर्णिमेच्या पहाटे गेल्या बावीस वर्षांहून अधिक काळ पंचगंगा घाटावर दीपोत्सव साजरा केला जातो. शिवमुद्रा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते गेले आठवडाभर दीपोत्सवाची तयारी करत असतात. दीपोत्सवाच्या सुरवातीला पंचगंगा घाट परिसरामध्ये विविधरंगी आणि मनमोहक अशा रांगोळ्या काढण्यात येतात. काही रंगोळ्यांमधून सामाजिक संदेश सुद्धा देण्यात येत असतात. पणत्या प्रज्वलित केल्यानंतर घाटावर फटाक्यांची आतषबाजीही करण्यात येते. बघता बघता संपूर्ण पंचगंगा नदी घाट परिसर हजारो पणत्यांनी उजळून निघतो.
ब्रह्मपुरी पिकनिक पॉइंटवरून जुन्या शिवाजी पुलावर लेझर - गेल्या काही वर्षांपासून येथील ब्रह्मपुरी पिकनिक पॉइंटवरून जुन्या शिवाजी पुलावर विविध रंगांचे लेझरचा प्रकाश पाडला जातो. त्यामुळे या दीपोत्सवाला एक वेगळाच साज चढवला जातो. शिवाय शिवाजी पुलावर सुद्धा पणत्यांच्या आकारामध्ये विद्युत रोषणाई करण्यात येते. त्रिपुरारी पौर्णिमेच्या या दीपोत्सवाचा अत्युच्च क्षण डोळ्यात साठवण्यासाठी कोल्हापूरकर पंचगंगा घाटावर गर्दी करत असतात. विशेषतः तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात दीपोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित असतात. सुमारे दोन तासांहून जास्त काळ प्रकाशाचा हा खेळ पंचगंगा घाट परिसरात अनुभवयाला मिळतो. आज रात्री पासून घाटावर दीपोत्सव तयारीला सुरुवात होते. पहाटे तीन वाजता दीपोत्सव साजरी होणार आहे.