कोल्हापूर- चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांचं पांढरं सोने म्हणजे घाटमाथ्यावरील काजू उत्पादन होय. काजू पिकाला पोषक वातावरण असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पादन होते, तसेच येथील काजूला बाजारात चांगली मागणी देखील असते, मात्र कोरोनासह नैसर्गिक संकटाने घाटमाथ्यावरील काजू उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदा केवळ पन्नास टक्केच उत्पादन झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे उत्पादनामध्ये घट झाली आहे, तर दुसरीकडे हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
दाट धुके, ढगाळ हवामान, पाऊस अशा कायम बदलणार्या हवामानामुळे काजूचे पीक संकटात सापडले आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे दर घसरल्याचे कारण देत, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी किंमतीमध्ये काजू विकत घेतला, त्याचा फटका या शेतकऱ्यांना बसला आहे. यंदाही नैसर्गिक संकटांमुळे काजू उत्पादनात तब्बल 50 टक्क्यांची घट झाली असून, मिळालेल्या उत्पादनाला देखील कोरोनामुळे योग्य दर मिळत नसल्याची व्याथा शेतकरी व्यक्त करत आहेत.
काजूला 100 रुपये प्रति कोलोचा दर
गेल्या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे झालेले प्रचंड नुकसान भरून काढण्यासाठी यावेळी शेतकऱ्यांनी कंबर कसली होती. मात्र यावेळीही पुन्हा लाॅकडाऊन सुरू झाले आहे. उत्पादन सुरू झाल्यानंतर दर एकदम घसरतात हा अनुभव पाठीशी असल्याने, काजू उत्पादक शेतकऱ्यांनी आपली काजू विक्री थांबवली आहे. याचा मोठा फटका या शेतकऱ्यांना बसत आहे. तसेच गेल्या वर्षी देखील कोरोनामुळे या शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. गेल्या वर्षी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून काजू 60 ते 80 रुपये दराने खरेदी केले होते, या वर्षी 100 रुपये दराने काजूची खरेदी सुरू आहे. मात्र काजूला किमान 150 रुपयांचा दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
'दरासाठी शेतकऱ्यांनी संयम बाळगावा'
यंदा काजू उत्पादन ५० टक्के झाले आहे. बाजारात आवक कमी आहे. त्या संधीचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. यंदा काजू विक्रीसाठी न काढता तो उशिराने विक्रीसाठी बाहेर काढावा, काजू उत्पादक शेतकऱ्याने काजू विक्रीसाठी संयम बाळगावा असे मत बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील यांनी व्यक्त केले आहे.
'भाताच्या धर्तीवर सरकारने काजूंच्या बियांची खरेदी करावी'
केंद्र आणि राज्य सरकार भात केंद्र सुरू करून ज्याप्रमाणे भात विकत घेते, त्या धर्तीवर काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. योग्य हमीभाव देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने काजू बिया खरेदी कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा - 'पुद्दुचेरी आणि तामिळनाडू वगळता कुठेही सत्तापरिवर्तन होणार नाही'