कोल्हापूर: कोल्हापूरातल्या हुपरी मधील जवाहर साखर कारखाना रोड वर मृदुला वाघमारे यांची बिअर शॉपी आहे. 'आबा बिअर शॉपी“ असे त्याचे नाव. मागील 2-3 वर्षांपासून त्यांनी या व्यवसायात लक्ष घातले आहे. साधारणपणे प्रत्येक दारूच्या दुकानात किंवा बिअरशॉप मध्ये पुरुषच आपल्याला पाहायला मिळतात. मात्र कोल्हापूर हा एक अपवाद म्हणावा लागेल. जिल्ह्यात सुद्धा कदाचित ही पहिलीच महिला आहे जी स्वतःहून बिअर शॉपी चालवते. खरंतर त्यांनासुद्धा या व्यवसायाबद्दल विरोध होताच. मात्र परिस्थिती अशी येत गेली की, त्यांना हा निर्णय घेण्यास शेवटी भाग पडले आणि मोठ्या हिंम्मतीने त्यांनी या शॉपीच्या गल्ल्यावर बसायचा निर्णय घेतला. रोज या मार्गावरून किंव्हा आजूबाजूचे अनेक लोकं त्यांच्या या शॉपीमधून बिअर घेताना दिसतात. काहीजण तर थोडा वेळ विचार सुद्धा करतात की, आपण त्यांच्याकडे खरंच बिअर घेऊयात का ? गोवासारख्या ठिकाणी हे चित्र सर्रास दिसत असले तरी महाराष्ट्रात असे चित्र क्वचितच पाहायला मिळते. विशेष म्हणजे, कोल्हापुरात तर पहिल्यांदाच दिसत आहे.
अन् बिअर शॉपी चालविण्याची आली वेळ: मृदुला यांचे वडील सतीश विष्णू वाघमारे यांचीच ही बिअर शॉपी आहे. हुपरी मधील सुर्या कॉलनी येथे ते वास्तव्यास आहेत. मात्र वडिलांचा ज्यावेळी 2019 च्या आसपास अपघात झाला तेव्हा त्यांना डॉक्टरांनी पूर्णपणे आराम करण्याची गरज असल्याचे सांगितले. सतीश वाघमारे यांना दोन मुली आहेत. त्यातील एक मृदुला वाघमारे आणि दुसरी सायली वाघमारे दोघींची सुद्धा लग्न झाली आहेत. त्यातील मृदुला या काही वर्षांपासून वडिलांच्या घरीच राहत आहेत. त्यांचा मुलगा सुद्धा इथे 8 वी वर्गात शिकत आहे. एकीकडे घरातील मुख्य व्यवसाय बिअर शॉपीचा असल्याने तोच वडिलांच्या अपघातानंतर बंद करण्याची वेळ आली. मात्र बिअर सहा महिन्यांच्या आधी वापराव्या लागतात. अन्यथा त्यांची एक्सपायरी डेट निघून जाते. वडील सतीश वाघमारे यांचा अपघात झाला तेव्हा दुकानात मोठ्या प्रमाणात बिअरचा साठा होता. जर तो विकला नाही तर लाखो रुपयांचे नुकसान होणार होते. अशा वेळी मृदुला समोर आल्या आणि त्यांनी वडिलांचा व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. स्वतःसह सर्वांचाच विरोध होता. मात्र न घाबरता आपण हा व्यवसाय सुरू ठेवू असा निर्णय घेत त्या आता मागील 2 ते 3 वर्षांपासून व्यवसाय चालवत आहेत.
वडिलांचा विरोध : मृदुला यांचे वडील सतीश वाघमारे यांचा या निर्णयाला विरोध होता. घरातील मुलगी अशा ठिकाणी बसावी असे त्यांना वाटतच नव्हते. मात्र आपली तब्येत ठीक नाही होत तोपर्यंत मी हा व्यवसाय सांभाळेल असे मृदुला म्हणाली. मात्र मागील दोन वर्षांत एकही वाईट अनुभव न आल्याने त्या सुद्धा आता यामध्ये रमल्या आहे. कोणत्याही भीतीशिवाय त्या हा व्यवसाय सांभाळत आहेत. वडिलांनी सुद्धा याचे आश्चर्य व्यक्त केले आहे.
अनेकांकडून कौतुकही : महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाही म्हणत मृदुला स्वतः आपल्या निर्णयावर समाधानी आहेत. अनेकजण सुरुवातीला त्यांच्या या निर्णयाकडे चुकीच्या आणि विचित्र पद्धतीने पाहत होते. मात्र जसजसे काही दिवस व्यवसाय सुरू ठेवला त्यानंतर अनेकांकडून मृदुला यांचे कौतुकही होऊ लागले. वडिलांच्या अपघातामुळे त्यांना हा व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि आता त्या बिनधास्तपणे इथे वावरत असतात. तर आपणही स्वतः आनंदी असल्याचे मृदुला यांनी म्हटले आहे. शिवाय वडिलांनीसुद्धा आपल्या मुलीचे कौतुक वाटते असे ते म्हटले.
हेही वाचा: Mosque Covered with Tirpal: सहा मशिदींना ताडपत्रीने झाकले, रंग फेकू नये म्हणून खबरदारी.