कोल्हापूर - दोन दिवसापूर्वी शहरातील उजळाईवाडी उड्डाण पुलाखाली झालेल्या स्फोटात एकजण ठार झाल्याची घटना घडल्यानंतर निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुन्हा मोठा बॉम्बसाठा आढळून आल्याने मोठी खळबळ माजली आहे. उजळाईवाडी स्फोटाचा तपास करत असताना पोलिसांना चौकशी दरम्यान या बॉम्बसाठ्याविषयी माहिती मिळाली. हातकणंगले तालुक्यातील माले मूडशिंगी गावात तब्बल 69 गावठी बॉम्ब सापडल्याने नागरिकांमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने संबंधित कारवाई केली असून, यामध्ये विलास जाधव, आनंदा जाधव अशा दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शिकारीसाठी बॉम्ब वापरत असल्याची आरोपींनी माहिती दिली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
माले मूडशिंगी गावात 69 गावठी बॉम्ब सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे
19 ऑक्टोबरला शहरातील उजळाईवाडी उड्डाण पुलाखाली बेवारस वस्तूला पाय लागल्याने स्फोट झाल्याची घटना घडली होती. यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर एकाच वेळी एवढा बॉम्बसाठा सापडल्याने शहरात दहशत पसरली आहे.