कोल्हापूर - गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज (दि. 13 एप्रिल) कोल्हापुरातील कागलमध्ये एक अनोखा गृहप्रवेश पार पडला. एकात्मिक विकास गृह योजनेअंतर्गत तब्बल 324 जणांचा हक्काची घरं मिळाली असून त्यांचा आज गृहप्रवेश करण्यात आला. एकात्मिक विकास गृह योजनेअंतर्गत कागलमध्येच घरकुलांची बांधणी करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना रखडली होती. मात्र, आज (मंगळवार) मुश्रीफ यांच्या हस्ते या नव्या घरांसमोर गुढी उभा करुन गृह प्रवेश करण्यात आला. विशेष म्हणजे ज्यांना घरे नाहीत, अशा लाभार्थ्यांना अवघे 50 हजार रुपये भरून 8 ते 10 लाखांपर्यंत किंमत असणारी घर देण्यात आले आहेत. शिवाय आपल्याला हक्काचे घर मिळाल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावरचा आनंदही यावेळी पाहण्यासारखा होता.
कागल नगरपालिकेचा 1 हजार 2 घरांचा प्रकल्प
यावेळी मुश्रीफ म्हणाले, झोपडपट्टी निर्मूलन करून घर बांधून देण्याची केंद्र सरकारची जी योजना होती त्या योजनेअंतर्गत 1 हजार 2 घरं बांधण्याचा प्रकल्प कागल नगरपालिकेने हातात घेतला होता. राज्यातील अनेक नगरपालिकांना हा प्रकल्प पूर्ण करता आला नव्हता मात्र कागल नगरपालीकेच्या माध्यमातून 1 हजार 2 घरांपैकी जवळपास 800 घरांचे वाटप आम्ही पूर्ण केले आहे, असेही मुश्रीफ यांनी म्हटले. शिवाय गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर सर्वांनी गुढ्या उभारून गृहप्रवेश करावा यासाठी आजच्या दिवशी सर्वांचा गृहप्रवेश करण्यात आला असेही ते म्हणाले.
माझ्या जीवनात अनेक आनंदाच्या क्षणांपैकी हा सर्वात आनंदी क्षण
आपले सुद्धा हक्काचे घर असावे, आपला संस्कार चांगला व्हावा, आपल्या मुला बाळांचे शिक्षण चांगलं व्हावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. अनेकांना झोपडपट्टी तर काहींना भाड्याच्या घरात राहावे लागते. मात्र, याच सर्वसामान्य नागरिकांना आज हक्काची घरं मिळाली असल्याने मला प्रचंड आनंद झाला आहे. आजपर्यंत माझ्या जीवनात अनेक आनंदाचे प्रसंग घडले आहेत त्यामध्ये हा सर्वात आनंदाचा क्षण असल्याचेही यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले. शिवाय हे सेवा करण्याची संधी मिळाली याचाही आनंद असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी मुश्रीफ यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना बनवलेल्या पोळी भाजीचाही आस्वाद घेतला.
अनेकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता आनंद
एकूण घरकुल योजनेपैकी आज 324 कुटुंबीयांच्या गृहप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी अनेकजण झोपडपट्टी तसेच भाड्याच्या घरातून थेट आपल्या हक्काच्या घरात राहायला आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत होता. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या गोष्टीची सर्वाधिक गरज होती त्या निवाऱ्याची सोय मुश्रीफ यांच्यामुळेच झाल्याच्या भावनाही यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या. शिवाय सर्वच लाभार्थ्यांनी मुश्रीफ यांचे आभार मानले.
हेही वाचा - केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत करावी - खासदार संभाजीराजे