कोल्हापूर : औरंगजेबच्या नावावर राज्यातील वातावरण तापू लागले आहे. औरंगजेबचे स्टेट्स ठेवण्यावरुन कोल्हापूर जिल्ह्यात तणाव निर्माण झाला होता. आता परत कोल्हापुरातील एका प्राध्यापिकेने औरंगजेबच्या समर्थनात विधान केले आहे. यानंतर या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या आहेत. हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याने हिंदुत्त्ववादी संघटनांनी प्राध्यापिकाविरोधात निषेध मोर्चा काढला.
जाहीर माफी मागा : शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात तासिका सुरू असताना महिला प्राध्यापिकेने औरंगजेब हा महिलांवर अत्याचार करत नव्हता. असे विधान प्राध्यापिकाने केले आहे. प्राध्यापिकेच्या या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले, युवा सेना जिल्हाधिकारी मांजित माने सागर साळोखे यांनी तात्काळ संबंधित महाविद्यालयात जाऊन त्या प्राध्यापक महिलेवर निलंबनाची कारवाई करावी. तसेच त्या महिलेने समस्त हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. जर हे केले नाहीतर महिलेच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे रविकिरण इंगवले यांनी दिला.
प्राध्यापिकेच्या घरावर मोर्चा : दरम्यान रविकिरण इंगवले मंजीत माने यांनी या महिलेला निवृत्ती चौकात येऊन जाहीर माफी मागण्यास सांगितले. यानंतर हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी निवृत्ती चौकात दाखल झाले या पार्श्वभूमीवर निवृत्ती चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत संबंधित महिलेला अटक करावी अशी मागणी करण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत या महिलेच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून सर्वांना ताब्यात घेतले. दरम्यान या सर्व प्रकाराने निवृत्ती चौक परिसरासह शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.
मागितली माफी : महाविद्यालयात तास सुरू असताना औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा कोणताही हेतू नव्हता. मात्र माझ्याकडून अनावधानाने कोणत्या समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते, असा माफीनामा संबंधित महिलेने महाविद्यालयाकडे दिला आहे. मात्र शहरातील लक्ष्मीपुरी जुना राजवाडा पोलिसांनी हा माफीनामा महाविद्यालय हद्दीतील पोलीस ठाण्याकडे देण्याची सूचना संबंधित महिलेला केली. या घटनेनंतर निवृत्ती चौकात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या शिवसेना आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
हेही वाचा -