कोल्हापूर - मला राज्य सरकारला एक सांगायचे आहे. त्यांनी केंद्राला निरोप द्यावा, एकदा जर महाराष्ट्र पेटला तर पंजाब आणि हरयाणापेक्षाही मोठा भडका उडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते 'ईटीव्ही भारत'सोबत बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने 'आत्मक्लेश जागर' आंदोलनाला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे.
पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांच्या दिल्ली येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानीचे राज्यभरात जागर आंदोलन सुरू आहे. भजन, अभंग म्हणत रात्रभर हे जागर आंदोलन चालणार आहे. मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहे.
हेही वाचा - इतरांच्या घरात चोऱ्या करून भाजपाने मतांची संपत्ती मिळवली; अशोक चव्हाणांची टीका
जागर आंदोलनात काँग्रेसचे दोन आमदार सहभागी -
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जागर आंदोलनात कोल्हापुरातील काँग्रेसचे दोन आमदारसुद्धा सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी या जागर आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत करवीरचे आमदार पी. एन. पाटील आणि कोल्हापूर-उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी याठिकाणी उपस्थिती लावली आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढाईत आम्ही सुद्धा सहभागी आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. तर शेतकऱ्यांच्यासाठीच्या या लढ्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल शेट्टी यांनी या दोन्ही आमदारांचे आभार मानले.