कोल्हापूर - येथील पोलिसांनी मटका बुकी, चालक आणि मालकांची पळता भुई थोडी केली आहे. एवढेच नव्हे तर ही कारवाई कोल्हापूर पुरती मर्यादित न ठेवता अवैध मटका व्यवसायातील पाळेमुळे शोधून बड्या धेंडांना पकडण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी मोठी पावले उचलायला सुरुवात केली आहे.
काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील मटकाबुकी सलीम मुल्ला आणि नगरसेविका शमा मुल्ला टोळीचे आता राज्याबाहेर सुद्धा कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. मुंबईमधील सावला टोळीच्या गुजरात व राजस्थानातील कोट्यवधींच्या उलाढालीत ज्याचा समावेश आहे. त्या बोरिवली ईस्ट मुंबई मधील जयेश हिरजी सावला याला रविवारी रात्री गुजरातमध्ये छापा टाकून बेड्या ठोकल्या आहेत.
संशयितावर ‘मोकां’तर्गत कारवाई करण्यात येत असून आज दुपारी सावलाला पुण्यातील मोका न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जयेश सावला याला रात्री उशिरा बंदोबस्तात कोल्हापुरात आणण्यात आले. तो मुंबई मटका साखळीतील म्होरक्या प्रकाश ऊर्फ पप्पू सावला याचा बंधू, तर विरल सावला याचा चुलता आहे. जयेशच्या अटकेनंतर मुंबईतील अनेकबडे मटकाबुकींचे धाबे दणाणले आहेत. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्या पतीच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकाण्यात आला होता.
दरम्यान, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकावर यावेळी शमा मुल्ला आणि त्यांच्या नातेवाईकांनी हल्ला केला होता. त्यानंतर 25 जणांना अटक करण्यात आली होती. शिवाय या टोळीचे कनेक्शन अजून कुठेपर्यंत आहे हे गेले अनेक दिवस पोलीस तपास करत होते. तपासादरम्यान टोळीचे कनेक्शन आता राज्याबाहेर म्हणजेच गुजरातमध्ये असल्याचे उघड झाले आहे.