कोल्हापूर - सध्या राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. एफआरपीचे तीन तुकडे करण्याचे हालचाली सुरू असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. याच अस्वस्थतेतून कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी येथील शेतकऱ्याने एफआरपी चे तीन तुकडे होऊ नयेत यासाठी जो नेता पुढाकार घेईल आणि तो लढा यशस्वी करेल त्याला आपली बागायती एक एकर जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे... कोण आहे हे शेतकरी? पाहुयात...
एफआरपीचे तीन तुकडे होऊ नयेत यासाठी लढा उभा करून यशस्वी करा -
कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील राजगोंडा पाटील हे प्रगतिशील शेतकरी आहेत. त्याचबरोबर ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही आहेत. त्यांची स्वतःची 18 एकर बागायती जमीन आहे. त्यामध्ये मुख्यत्वे करून ऊस पीक घेतात. सध्या एफआरपी चे तीन तुकडे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. हा प्रश्न निकालात लागावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. माजी खासदार राजू शेट्टी हे यासाठी पुढाकार घेत आहे, मात्र काही नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एफआरपीचे तीन तुकडे थांबवू असा दावा करत आहेत. त्यामुळे राजगोंडा पाटील यांनी महाराष्ट्रातील 288 आमदार आणि 48 खासदार यांना आव्हान दिले, एफआरपी चे तीन तुकडे होऊ नयेत यासाठी कोणीही पुढाकार घ्यावा आणि हे थांबावा मी त्याला स्वतःची एक एकर बागायती जमीन बक्षीस देईन असे जाहीर केले आहे.
राजू शेट्टी यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही नेत्याने हा लढा उभा करून यशस्वी करावा -
राजगोंडा पाटील यांनी आपली एक एकर शेती देण्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी म्हंटले की, राज्यातल्या काही नेत्यांना मी एक एकर शेती देणार ही मोठी गोष्ट वाटणार नाही मात्र आमच्यासाठी शेती हेच सर्वस्व आहे. तरीही या एफआरपीच्या तुकड्यांमुळे शेतकरी मेटाकुटीला आले असल्याने बक्षीस म्हणून आपण एक एकर जमीन देण्याची घोषणा केली आहे. माजी खासदार राजू शेट्टी गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत लढा देत आहेत. इतर कोणताही नेता यामध्ये भाग घेत नाहीये. त्यामुळे राज्यातल्या कोणत्याही आमदाराने किंव्हा खासदाराने याबाबत आवाज उठवला आणि तो यशस्वी केला तर ताबडतोब आपली एक एकर जमीन बक्षीस म्हणून संबंधित नेत्याच्या नावावर करणार असल्याचे त्यांनी म्हटले.