कोल्हापूर : विक्री आणि तस्कारीसाठी बंदी असलेल्या व्हेल माशाची उलटी कोल्हापूर पोलिसांनी जप्त केली आहे. व्हेल माशाची उलटी म्हणजे अंबरग्रीस अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. आंबोली आजरा मार्गावर सापळा रचून त्यांच्याकडून तब्बल 10 कोटी 74 लाख 10 हजार किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पाच जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ही आजपर्यंतची कोल्हापूर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
10 कोटी 74 लाख 10 हजारांचा माल जप्त : गेल्या काही दिवसात कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात व्हेल माशाच्या उलटीची तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे. याबाबतीत कोल्हापूर पोलिसांनी दोन ते तीनवेळा सापळा रचून व्हेल माशाची उलटी जप्त केली. आज पुन्हा एक नवीन प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरातील गवसे तालुका आजरा येथे आजरा पोलिसांनी 10 कोटी 74 लाख 10 हजार रुपये किमतीचे व्हेल माशाची उलटी जप्त केली. ही आजपर्यंतची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असून या व्हेल माशाच्या उलटीचे वजन 10 किलो 688 ग्रॅम इतके आहे. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पाच जण पोलिसांच्या ताब्यात : व्हेल माशाच्या उटली तस्करी प्रकरणी कुडाळच्या पाच जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आला आहे. कुडाळ येथून व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्यात येणार असल्याची गुप्त माहिती आजरा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आजरा पोलिसांनी सकाळपासूनच अंबोली आजरा मार्गावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून बसले होते. दरम्यान या मार्गावरून सदर संशयित आरोपी जात असताना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यात व्हेल माशाची उलटी मिळून आली.
प्रकरणी संशयित आरोपी अकबर याकुब शेख, रा. पिंगोली मुस्लिमवाडी ता. कुडाळ जि.सिंधुदुर्ग, शिवम किरण शिंदे, रा. अभिनवनगर नं. 02 कुडाळ जि. सिंधुदुर्ग, गौरव गिरीधर केरवडेकर, रा. केरवडे तर्फ माणगाव ता. कुडाळ जि.सिंधुदुर्ग, इरफान इसाक मणियार, रा. पोस्ट ऑफिस गणेशनगर. कुडाळ जि.सिंधुदुर्ग आणि फिरोज भावुदिन ख्वाजा, रा. कोलगाव ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग या 5 जणांना ताब्यात घेण्यात आले असून आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा..