कोल्हापूर - नोकरीच्या आमिषाने बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळी यांनी हा आरोप केला असून, त्यांनी याबाबतची एक सीडी सुद्धा जाहीर केली आहे. या प्रकारानंतर कर्नाटकच्या राजकारणात नवा भूकंप निर्माण झाला आहे. दरम्यान, काही ठिकाणी जारकीहोळी यांच्या विरोधात निदर्शने सुद्धा करण्यात येत आहेत. दरम्यान या सीडीमध्ये दिसणारे रमेश जारकीहोळीच आहेत की अन्य कोण आहे हे स्पष्ट होणे गरजेचे असून, संबंधित मंत्र्यांच्या चौकशीची सुद्धा कळहली यांनी मागणी केली आहे.
पीडित युवतीच्या कुटुंबीयांची तक्रार नोंदविण्याची विनंती
नोकरीच्या निमित्ताने रमेश जारकीहोळी यांनी एका युवतीवर अत्याचार केला आहे. तिच्या कुटुंबीयांनी माझ्याशी संपर्क साधून तक्रार नोंदविण्याची विनंती केली होती, अशी माहिती दिनेश कलहळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. त्याचबरोबर दिनेश कलहळी यांनी पोलीस आयुक्तांकडे मंत्र्यांविरूद्ध चौकशी करण्याची मागणी सुद्धा केली आहे. दरम्यान, रमेश जारकीहोळी यांच्या त्या सीडीमुळे कर्नाटकातील विरोधीपक्ष आक्रमक झाला असून, अनेक संघटनांनी या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे.
जारकीहोळी यांनी राजीनामा द्यावा
अश्लिल सीडी जाहीर झाल्यानंतर आता मंत्री रमेश जरकीहोळी यांनी राजीनामा द्यावा अशी युवक कॉंग्रेसने मागणी केली आहे. शिवाय रमेश जरकीहोळी यांच्या उपहासात्मक चित्रांसह त्यांचा निषेध नोंदविला आहे. आता विरोधी पक्षांसह राज्यातील इतर संघटना सुद्धा आक्रमक झाल्या असून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
...तर मला फाशी द्या - जारकीहोळी
कुलहळ्ळी या व्यक्तीला मी ओळखत नाही. ती युवती कोण मला माहिती नाही. मला त्या सीडीची ही कोणतीच माहिती नाही. असे घाणेरडे कृत्य आपण करणार नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊ द्या. चूक असल्यास मला फाशी द्या. अशी प्रतिक्रिया रमेश जारकीहोळी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली आहे.