कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शारदीय नवरात्र उत्सवातील अंबाबाई मंदिरात होणारे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच नऊ दिवसांच्या कालावधीत पायी निघणाऱ्या टेंबलाई देवी भेट, सोने लुटण्यासाठी जाणारी पालखी आणि नगरप्रदक्षिणा यंदा वाहनातून केली जाणार आहे, अशी माहिती पश्चिम-महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली.
जाधव म्हणाले, अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाला दरवर्षी 20 ते 25 लाख भाविक येत असतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या महासंकटामुळे शासनाने राज्यातील सर्वच मंदिरे अद्याप बंद ठेवली आहेत. शासनाच्या सुचनेनूसार यावर्षी मंदिरातील नवरात्रोत्सव होणार आहे. मात्र, त्यात सामान्य नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरातील नित्य अभिषेक, नऊ दिवसातील विविध प्रकारच्या पुजा, पालखी सोहळा या सर्व परंपरा मंदिराअंतर्गत जोपासल्या जाणार आहेत. तसेच मंदिरातील प्रमुख पुजारी, पदाधिकाऱ्यांच्या खेरीज कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
दरवर्षीप्रमाणे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात आले आहेत. ज्या भक्तांना अभिषेक देणगी द्यावयाची असेल त्यांनी देवस्थानच्या वेबसाईच्या माध्यमातून ऑनलाईन अभिषेक-देणगी द्यावी. त्यांना त्यांच्या पत्त्यावर प्रसाद पाठवला जाईल. उत्सवानंतर अंबाबाईचा महाप्रसाद (भंडारा) ही यावर्षी मंदिर सामान्य भाविकांसाठी होणार नाही. केवळ मंदिराशी निगडीत घटकांच्या माध्यमातून देवीचा नैवेद्य विधी होणार आहे, अशी माहिती जाधव यांनी दिली.
शहरातील मुख्य चौकात होणार देवीचे दर्शन -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. ऐन उत्सवाच्या काळात भाविकांच्या उत्साहावर पाणी फिरू नये, यासाठी शहरातील मुख्य चौकात देवीचे दर्शन होण्यासाठी एलईडी स्क्रिन लावण्यात येणार आहेत. तसेच फेसबुक, युट्यूबच्या माध्यमातून जगभरात टेलिकास्ट केले जाणार आहे.