कोल्हापूर - मराठा आरक्षणा संदर्भात केंद्र सरकारने फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. राज्य सरकारने देखील सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घ्यावा. तसेच मराठा समाजासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे डायनॅमिक मंत्री आहेत. त्यांनी तातडीने निर्णय घ्यावा, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये अस्वस्थता पसरली होती. मात्र केंद्र सरकारने त्यावर फेरयाचिका दाखल केल्याने त्याला एक गार झुळूक मिळाली आहे. केंद्र सरकारने 102 घटना दुरुस्तीवर फेरविचार याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच ही फेरी याचिका दाखल करायला हवी होती. मात्र तातडीने केंद्राने ही फेरीयाचिका दाखल केली, याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल फेटाळल्याने आता नवीन मागास समिती स्थापन करून अहवाल तयार केला पाहिजे. तो राज्य सरकारने स्वीकारायला पाहिजे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच हे आरक्षण मिळविण्यासाठी पुन्हा एकदा सर्कल सुरू झाले आहे. आरक्षणाचा लढा सुरूच राहणार आहे. न्यायालयीन लढाई सुरूच राहील. मात्र आरक्षण मिळेपर्यंत राज्य सरकारने मराठा समाजाकडे दुर्लक्ष करू नये, मराठा समाजाला तीन हजार कोटींचे पॅकेज जाहीर जाहीर करावे. त्यातील अण्णासाहेब पाटील महामंडळाला एक हजार कोटी ची तरतूद असावी. तसेच मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन फीची जबाबदारी यामध्ये असावी. उर्वरित रक्कम ही मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी असावी, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तीन हजार कोटी ही रक्कम किरकोळ आहे. ही द्यायला काही हरकत नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे डायनॅमिक मंत्री आहेत. त्यांनी हा निर्णय तातडीने घ्यावा, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजपच्या नावाने बोंब मारणे हे त्यांचे कामच -
अशोक चव्हाण यांनी ठरवले आहे की, रोज मोदींच्या नावाने बोंब मारायची. त्यांना राहुल गांधी यांनी सांगितले आहे. त्यामुळे रोज उठून भाजपच्या नावाने बोंब मारणे हे त्यांचे कामच आहे. काहीही झालं तरी पाय वर करण्याची भूमिका चव्हाण यांची असते. राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल करण्यापूर्वीच केंद्र सरकारने केली. त्यांचे अभिनंदन करण्याऐवजी तुम्ही टीका करण्याशिवाय काही करत नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.