कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराजांची इंग्लंडमध्ये असलेली जगदंबा तलवार परत आणावी, या मागणीसाठी कोल्हापूरच्या शिवदुर्ग संवर्धन आंदोलनच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी इंग्लंड विरोधात घोषणा देण्यात आल्या. शिवाय हा विषय इंग्लंडच्या राणीपर्यंत पोहोचवा यासाठी येत्या 23 मार्चला पुण्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्यालासुद्धा इंग्लंडच्या संघाला विरोध करणार असल्याचा इशारा शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाच्या वतीने देण्यात आला. आज कोल्हापूरच्या तावडे हॉटेल येथे जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. या आंदोलनानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
भेट स्वरूपात दिली होती जगदंबा तलवार
छत्रपती शिवरायांच्या अनेक तलवारींपैकी एक प्रमुख तलवार करवीर छत्रपती घराण्याकडे होती. त्याचे जगदंबा तलवार असे नाव होते. आज इंग्लंडच्या राणीच्या व्यक्तिगत संग्रहात असणाऱ्या 'रॉयल कलेक्शन ट्रस्ट'या ठिकाणी सेंट जेम्स पॅलेस येथे ही तलवार ठेवण्यात आली आहे. कोल्हापूर छत्रपतींच्या गादीवर छत्रपती महाराज चौथे हे अकरा वर्षांचे असताना इंग्लंडचा तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स (सातवा एडवर्ड) हा भारत भेटीवर आला होता. सन 1875-76 मध्ये त्यांना हीच जगदंबा तलवार भेट म्हणून दिली होती. हीच इंग्लंड येथे असणारी जगदंबा तलवार भारतात परत यावी, अशी शिवभक्तांची भावना आहे. त्यासाठीच आता शिवभक्त आक्रमक झाले आहेत. आज रास्तारोको करण्यात आला. आता हाच विषय इंग्लंडच्या राणीपर्यंत पोहोचवण्यासाठी येत्या 23 मार्चला पुण्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्याला सुद्धा इंग्लंडच्या संघाला विरोध करणार असल्याचा इशारा शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाच्या वतीने देण्यात आला आहे.
हेही वाचा - सचिन वझेंच्या 'त्या' व्हाटसअॅप स्टेटस संदर्भात माहिती घेऊन बोलतो - गृहमंत्री अनिल देशमुख
हेही वाचा - ...तर विश्वासघातकी महाविकास आघाडी विरोधात रस्त्यावर उतरणार - राजू शेट्टी