कोल्हापूर : आजपर्यंत आमच्या बँकेवर कोणताही डाग नाही. आम्ही कोणालाही बेकायदेशीर कर्ज वाटप केलेले नाही. आमची बँक ज्यांच्या अधिकारात आहे त्या नाबार्ड, महाराष्ट्र सहकारी बँक, रिझर्व्ह बँक, सहकार खाते यातील कोणीही आजपर्यंत बँकेवर ताशेरे ओढले नाहीत. मात्र ईडीने कारवाई केली आहे. यातून त्यांचा हेतू दिसून येतो आहे असे बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हंटले आहे. शिवाय आमच्या अधिकाऱ्यांची तब्बल 30 तास चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले आहे ते नक्कीच योग्य माहिती देतील असेही त्यांनी म्हंटले आहे. बँकेवर ईडी कारवाईनंतर त्यांनी पहिल्यांदा माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
मी योग्य वेळी बोलेन : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर झालेल्या कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आपण याबाबत लवकरच माहिती घेऊन बोलणार असल्याचे म्हंटले आहे. आमच्या 5 अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन काही कागदपत्रे सुद्धा ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. मात्र आमचे अधिकारी याला सामोरे जातील. मला अध्याप काय चौकशी झाली याबाबत माहिती नाही असेही ते म्हणाले. शिवाय ज्या बँकेला आपण भक्कम बनवले जिच्यावर एकही डाग नव्हता त्याच बँकेवर ईडीने चौकशी करत कारवाई केली आहे यातूनच त्यांचा नेमका काय उद्देश आहे हे दिसुन येते असेही मुश्रीफ म्हणाले.
ईडी अधिकाऱ्यांकडून 30 तास तपासणी : काल बुधवार एक फेब्रुवारी रोजी सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेवरती धाड टाकली. अथणी आणि गडहिंग्लज येथील बँकेच्या शाखेवरती सुद्धा ईडीच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी छापा टाकला होता. काल सकाळपासून रात्री उशिरा बारापर्यंत ईडीच्या अधिकारी बँकेत विविध कागदपत्रांची तपासणी करत होते. रात्री बारा वाजता कारवाई थांबवल्यानंतर आज गुरुवार 2 फेब्रुवारी रोजी सुद्धा सकाळी ईडी अधिकारी बँकेत दाखल झाले. आज सुद्धा दिवसभर विविध कागदपत्रांची त्यांनी तपासणी केली आणि सायंकाळी सहाच्या सुमारास महत्त्वाच्या कागदपत्रांसह बँकेच्या पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. तब्बल 30 तास ही तपासणी सुरू होती. यांच्याकडून आता काय माहिती मिळणार पहावा लागणार आहे.