कोल्हापूर - हातकणंगले तालुक्यातील खोची येथील अल्पवयीन मुलीचा अत्याचार करून खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आरोपी बंडा उर्फ प्रदीप पोवार ( वय 30 वर्षे, रा. खोची, ता. हातकणंगले ) यास दोषी ठरवत आरोपीला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश वृषाली व्ही. जोशी यांनी सुनावली आहे.
अपहरण, अत्याचार, हत्या - हातकणंगले येथील खोची येथे दिनांक 31 ऑक्टोबर, 2021 रोजी एका अल्पवयीन मुलीला तिच्या राहत्या घरातून अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करून केल्याची घटना घडली होती. तर पीडित मुलीचा मृतदेह त्याचदिवशी सायकांळी गावालगतच्या मुस्लिम समाजाच्या दफनभूमीच्या कंपाउंडमध्ये एका झाडाखाली आढळून आले होते. या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी तपासी अधिकारी म्हणून पेठवडगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी महत्त्वाची भूमिका बजावत काही तासातच आरोपी प्रदीप उर्फ बंडा पोवार यास जेरबंद केले. अवघ्या 31 दिवसात पोलिसांनी तपास पूर्ण करून संशयीता विरूध्द 225 पानी दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले होते.
मरेपर्यंत कारावासाची शिक्षा - या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. 22 मार्चपासून सुनावणीला सुरुवात झाली आणि सरकार पक्षातर्फे एकूण 28 साक्षीदार तपासून मरणोत्तर तपासणी अहवाल, शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळ पंचनामा, आरोपी आणि पीडित बालिका यांच्या कपड्यांचे पंचनामे, घरझडती पंचनामा,आरोपीने पंचनाम्यादरम्यान काढून दिलेले घटनेच्यावेळी वापरलेले रक्तलांछित कपडे, चप्पल, फोरेन्सिक प्रयोगशाळेचे अहवाल, घटनास्थळ आणि इतर पंचनाम्याचे फोटो, आरोपी व पीडित बालिका यांना घटनेच्या अगोदर पाहिलेले प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार, अशी भक्कम पुराव्याची साखळी न्यायालयासमोर सादर करण्यात आली. आरोपी बंडा उर्फ प्रदीप पोवार यास फाशीच्या मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली होती. मात्र, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली व्ही. जोशी यांनी आरोपी पोवार याला दोषी ठरवत मरेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा - कोल्हापूरच्या कस्तुरीकडून अन्नपूर्णा-1 शिखर सर; कस्तुरी ठरली जगातील सर्वात तरुण महिला गिर्यारोहक