कोल्हापूर - नालेसफाईचा अभाव तसेच ओढ्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे पावसाळ्यात ओढ्यासह नाल्यातील पाणी कोल्हापुरातल्या सम्राटनगर परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये शिरते. त्यामुळे वाढलेली अतिक्रमणे तत्काळ काढण्याच्या मागणीसाठी 'आप'ने थेट ओढ्यात उतरून आंदोलन केले आहे. शिवाय यापुढे घरांमध्ये पाणी शिरल्यास परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन महापालिकेवर ओढ्यातील पाणी घेऊन 'बादली मोर्चा' काढण्याचा इशाराही यावेळी आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला.
शहरातील सम्राटनगर येथील ओढ्यात झालेल्या अनाधिकृत बांधकामांमुळे दरवर्षी पावसाळ्यात ओढ्या शेजारील घरांमध्ये पाणी येते. ही गोष्ट वारंवार महापालिकेच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. परंतु यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ओढ्यामध्ये अतिक्रमण करून केलेल्या बांधकामामुळे पावसाळ्यात रात्री-अपरात्री घरांमध्ये पाणी शिरत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत पाठपुरावा करून देखील हा प्रश्न सुटत नसल्याने पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने ओढ्यामध्ये उतरून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, युवाध्यक्ष उत्तम पाटील, मोईन मोकाशी, बसवराज हदीमनी, प्रथमेश सूर्यवंशी, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, आदम शेख, विशाल वठारे, राज कोरगावकर, विजय भोसले, रवी पाटील, विजय हेगडे, भाग्यवंत डाफळे आदी उपस्थित होते. 'आप'च्या या आंदोलनाची दखल घेत उपशहर नगररचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता बाबुराव दबडे व इतर महापालिका कर्मचारी घटनास्थळी आले. अधिकाऱ्यांनी नाल्यात उतरून अतिक्रमण झालेल्या ठिकाणची पाहणी केली आणि संबंधित अपार्टमेंट व शासकीय कार्यालयाला नोटीस बजावून अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्याचे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा -Mumbai rains live updates: मुंबईत पाणी साचणार नाही असं कधीच बोलले नाही - महापौर